Yavatmal engineer realizes multi-purpose ventilator, also approved by Central Government, | यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी व्हेंटिलेटर, केंद्र सरकारचीही मान्यता

यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी व्हेंटिलेटर, केंद्र सरकारचीही मान्यता

यवतमाळ : ग्रामीण भागात अपघातग्रस्त रुग्णांना व इतर आजाराच्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये जीवनरक्षक प्रणाली उपलब्ध होत नाही. हे डोळ्यासमोर ठेवून यवतमाळमधील अभियंत्याने बहुपयोगी तसेच कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. यासाठी केंद्र सरकारची मान्यताही मिळाली आहे. या व्हेंटिलेटरमुळे ग्रामीण भागातील अपघाती मृत्यूचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

आकाश सूर्यकांत गड्डमवार या युवा अभियंत्याने हे बहुपयोगी व्हेंटिलेटर तयार केले आहे. मेकॅनिकलमध्ये एम.टेक असणाऱ्या आकाशने यासाठी २०१९ पासून संशोधन सुरू केले होते. सुरुवातीला त्याने प्रायोगिक तत्त्वावर दोन व्हेंटिलेटर तयार केले. यात त्याला जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीतील प्रा. डॉ. सागर गड्डमवार यांनी सहकार्य केले. यानंतर पीजीआयएमईआर चंदीगड या संस्थेच्या बधिरीकरण विभागातील डॉ. राजू चव्हाण यांनी आकाशच्या संशोधनाची दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात परिपूर्ण असा व्हेंटिलेटर तयार करण्यात आला. त्यानतंर गायरो ड्राईव्ह मशीनरी प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

व्हेंटिलेटर तयार करून त्याला आयएसओची मान्यता मिळवण्यात आली असून, त्याचे पेटंटही घेण्यात आले आहे. त्यावर चार संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहे. आता या व्हेंटिलेटरला बांगलादेश, युगांडा, टांझानिया यासारख्या विकसनशील राष्ट्रांकडून मागणी होत आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये
- अगदी सहा किलो वजनाचा व लिथियम बॅटरीवर चालणारे व्हेंटिलेटर
- सायकल, दुचाकीवरही सहज वापरात येतो
- गरज पडल्यास ऑक्सिजन जोडण्याचीही सुविधा
- प्रसंगी हवेतील ऑक्सिजनवरही हे व्हेंटिलेटर रुग्णाला कृत्रिम श्वास देऊ शकते
- हाताळण्यास सहज व सोपे आहे.

ग्रामीण भागातील अभियंते आपल्या परिस्थितीचा विचार करून संशोधन करण्यास पुढे येत नाहीत. उलट समाजाला कशाची गरज आहे, याची जाण ग्रामीण भागातील अभियंत्याकडे असते. आमच्या संशोधनामुळे ग्रामीण भागातील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
- आकाश सूर्यकांत गड्डमवार, अभियंता

Web Title: Yavatmal engineer realizes multi-purpose ventilator, also approved by Central Government,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.