जनआरोग्य योजना लाभात यवतमाळ जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:00:36+5:30
अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ११ हजार ४३० शिबिरे झाली. यातही यवतमाळ जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार १०८ आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ३४ हजार ८०० रुग्णांना लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयांमध्ये यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने १ एप्रिलपर्यंत ५८ शस्त्रक्रिया केल्या आहेत.

जनआरोग्य योजना लाभात यवतमाळ जिल्हा अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयातही ही योजना लागू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयाने सर्वाधिक रुग्णांना या योजनेत सामावून घेतले आहे. इतकेच काय कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही सर्वाधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमही यवतमाळातील खासगी रुग्णालयाने केला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य शिबिरे घेण्यात आली. अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ११ हजार ४३० शिबिरे झाली. यातही यवतमाळ जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार १०८ आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ३४ हजार ८०० रुग्णांना लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयांमध्ये यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने १ एप्रिलपर्यंत ५८ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यानंतर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. खासगी रुग्णालयांमध्येही यवतमाळ अव्वल स्थानी आहे. यवतमाळातील येलनारे हॉस्पिटलने लॉकडाऊनच्या काळात अमरावती विभागामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया करून रुग्णांना लाभ दिला. तब्बल १०३ शस्त्रक्रिया एकट्या येलनारे हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत. अमरावती विभागात शासकीय व खासगी या दोन्ही रुग्णालयाच्या माध्यमातून जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात यवतमाळ जिल्हा अग्रस्थानी राहिला आहे. जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब घटकांना लाभ देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. त्यामध्ये खासगी व शासकीय रुग्णालय अंतर्भूत केले आहे. ही योजना अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सीएमओ डॉ. दर्शन चांडक, डॉ. अंकिता वायकर, योजनेचे जिल्हा समन्वय अधिकारी सुरेंद्र इरपनवार, अतुल नागरगोजे, आरोग्य मित्र अक्षय भागानागरकर या सर्वांच्या पुढाकारात योजनेची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे.
संसर्गाच्या सावटातही बजावली रुग्णसेवा
कोरोना विषाणू संसर्गाचे सातत्याने रुग्ण आढळत असल्याने यवतमाळ शहर रेड झोनमध्ये आले होते. अशा काळात अनेक खासगी डॉक्टरांनी जवळपास कामकाज थांबविले होते. या स्थितीतही यवतमाळ शासकीय रुग्णालय व येलनारे हॉस्पिटलने आपली सेवा अविरत सुरू ठेवत अत्यावश्यक शस्त्रक्रिया पार पाडल्या.
लॉकडाऊन काळात शस्त्रक्रिया करण्यामध्ये यवतमाळचे खासगी हॉस्पिटल व शासकीय हॉस्पिटलने विशेष परिश्रम घेतले. त्यामुळेच अमरावती विभागात अव्वल स्थान मिळाले आहे.
- डॉ. सुनील वाठोरे
विभागीय व्यवस्थापक,
जनआरोग्य योजना