यवतमाळ जिल्ह्यात १८ एकरातील कपाशीवर शेतकऱ्याने फिरविले रोटावेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 20:39 IST2020-11-11T20:37:34+5:302020-11-11T20:39:25+5:30
सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १८ एकरातील कपाशीवर शेतकऱ्याने फिरविले रोटावेटर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे पीकही शेतातून उपटून फेकण्याचा सपाटा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लावला आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडणे, ट्रॅक्टर चालविणे, राेटावेटर फिरविणे सुरू केले आहे. नेर, आर्णी, यवतमाळ, मारेगाव, झरीजामणी तालुक्यात या घटना घडल्या आहेत. राळेगावातही बुधवारी हा प्रकार पहायला मिळाला.
राळेगाव तालुक्याच्या आष्टा येथील अमृत खंडारे यांनी १८ एकरात सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे पाच एकरातील सोयाबीन हातचे निघून गेले. त्यामुळे त्यांची आशा १३ एकरातील कपाशीवर होती. परंतु परतीचा पाऊस व बोंडअळीने कपाशीचे पीकही नेस्तनाबूत केले. मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कीटकनाशक फवारणीनेही ते नियंत्रण येणार नाही याची जाणीव झाल्याने शेतकरी अमृत खंडारे हतबल झाले. ते एकत्र कुटुंब पद्धतीने शेती करतात. शासनाच्या नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्याने ती मदतीस पात्र ठरत नाही. यावर्षी त्यांनी सोयाबीन, कपाशी लागवडीवर तीन लाख रुपयांचा खर्च केला. मात्र प्रत्यक्षात नफा तर दूर लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. लावलेल्या पैशावर आणि अनेक महिने घेतलेल्या परिश्रमावर पाणी फेरले गेल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी शेतात थेट रोटावेटर लावून संपूर्ण १८ एकरातील सोयाबीन व कपाशी उपटून फेकली. या कुटुंबासमोर आता पुढे जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.