यवतमाळ पालिकेतील अस्थिरता कायम

By Admin | Updated: December 8, 2014 22:40 IST2014-12-08T22:40:11+5:302014-12-08T22:40:11+5:30

नगरपरिषदेतील राजकीय अस्थिरता अद्यापही कायम आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगरपरिषदेत नेमकी सत्ता कोणाची, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. भाजपाकडून त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षाची कोंडी करण्यात आली.

Yavatmal continued to maintain instability in the corporation | यवतमाळ पालिकेतील अस्थिरता कायम

यवतमाळ पालिकेतील अस्थिरता कायम

यवतमाळ : नगरपरिषदेतील राजकीय अस्थिरता अद्यापही कायम आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगरपरिषदेत नेमकी सत्ता कोणाची, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. भाजपाकडून त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षाची कोंडी करण्यात आली. आताही तोच कित्ता गिरवला जात आहे. ४ नोव्हेंबर रोजी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेकडे नगरसेवकांनी पाठ फिरवून एकप्रकारे नगराध्यक्षांवर दबाव निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व घडामोडी सभापती निवडणुकीसाठी होत आहेत.
राजकीय सारिपाटावर कधीही निर्माण झाली नसेल इकती गुंतागुंत यवतमाळ नगरपरिषदेत पहावयास मिळते. कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले कधी एकत्र येईल आणि कट्टर समर्थक कधी विरोधक होतील, हे कळतसुध्दा नाही. योगेश गढिया यांना पदावरून उतरविण्यासाठी धडपडणाऱ्यांनीच सुभाष राय यांची नगराध्यक्षपदी निवड व्हावी, अशी भूमिका घेतली. आता हीच मंडळी राय यांना पुरेपूर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पालिकेतील अर्थकारण चालविणारे कचऱ्याचे कंत्राट आणि १९ डिसेंबर रोजी होणारी विषय समिती सभापतींची निवडणूक कारणीभूत मानली जात आहे.
विषय समित्या ठरविताना नगराध्यक्ष म्हणून आपली भूमिका महत्त्वपूर्ण राहावी यासाठी राय यांच्याकडून हालचाली केल्या जात आहे तर, पक्षाच्या नेत्यांनी आम्ही ठरवू त्याचीच विषय समिती सदस्य आणि सभापती म्हणून निवड होणार अशी भूमिका घेतली आहे. या कुरघोडीत नगरपरिषदेत पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. प्रत्येकालाच कायम संख्याबळ दाखविण्यासाठी धडपडावे लागत आहे. या अस्थिरतेमुळेच शहरातील विकास कामे खोळंबली होती. आताही तोच कित्ता येथे गिरविला जात आहे.
पदाधिकारी आणि नगरसेवक आपसातच भिडत असल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. नगराध्यक्ष म्हणून राय यांनी पदभार स्वीकारताच सुरुवातीचे काही दिवस प्रशासन बऱ्यापैकी चालले. त्यानंतर मात्र हळूहळू पकड सैल होताना दिसत आहे. अशा वातावरणात शहर विकासाठी महत्त्वपूर्ण ठराव घेणे शक्य होत नाही. प्रत्येक जण विरोधासाठी विरोध करत असल्याचे चित्र आहे. शहरात नव्याने निर्माण झालेल्या समस्यांकडे कोणाचेच लक्ष नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal continued to maintain instability in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.