राष्ट्रवादी लढविणार यवतमाळ, आर्णी विधानसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:12 IST2018-01-18T22:12:32+5:302018-01-18T22:12:57+5:30
राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, ......

राष्ट्रवादी लढविणार यवतमाळ, आर्णी विधानसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, असे राष्टÑवादीचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.
बाजोरिया गुरुवारी येथे पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना राज्यसरकारचा पाठिंबा काढणार नाही, पण भाजपचा सेनेला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. फार तर याच वर्षीच्या डिसेंबरपर्यंत निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबत आघाडी करावी का, याबाबत पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्यानुसारच आम्ही वागू. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील स्थिती त्यांच्यापुढे नक्कीच ठेवू. काँग्रेस आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक देत आहे, ते पाहाता किती दिवस आपण काँग्रेसला ‘सपोर्ट’ म्हणूनच काम करायचे, हा प्रश्नही विचारणार आहोत. वरिष्ठांनी आघाडी केलीच तर आर्णी, यवतमाळ, पुसद या तीन जागा मिळाल्याच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील. आर्णीमध्ये डॉ. आरती फुपाटे यांच्या रूपाने आमच्याकडे उच्चशिक्षित उमेदवारही आहे. त्यामुळे अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, आम्ही आर्णी आणि यवतमाळ या दोन जागा तर लढवणारच आहोत. पुसदचा प्रश्नच नाही. पण आर्णी आणि यवतमाळमध्ये मी स्वत: उमेदवार देईन आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदही लावेल, असे माजी आमदार बाजोरिया यांनी सांगितले.
आघाडी झाल्यावर दरवेळी काँग्रेस आमच्या जागा घेते. ज्या वणीत सतत भाजपा निवडून येत आहे, तेथेही काँग्रेसच दावा करते. पण यावेळी आम्ही तसे होऊ देणार नाही. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सतत कारवाया सुरू आहेत. आम्हीही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार आहोत. ज्यांनी राष्ट्रवादीत सर्व पदे भोगली, ते आता काँग्रेसच्या छत्राखाली जाऊन काहीतरी करण्याची धडपड करीत आहे. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, ते आता शेतकरी संघर्ष समिती निर्माण करून आंदोलन करीत आहे, अशी टीकाही बाजोरिया यांनी केली. शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई जाहीर झाली, त्यासाठी राष्ट्रवादीने केलेले हल्लाबोल आंदोलनच कारणीभूत आहे, असा दावाही त्यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे स्वतंत्र निवेदन
शेतकºयांच्या मदतीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शेतकरी संघर्ष समितीच्या चक्रीधरणे आंदोलनात राष्ट्रवादी सहभागी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे, अशी माहिती माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भानंतर सध्या मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होणार आहे. त्यामुळे इतरांच्या बॅनरखाली आंदोलन करण्याची गरजच नाही, असे मत यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.