कोळसा कामगारांचे कामबंद
By Admin | Updated: January 5, 2015 23:13 IST2015-01-05T23:13:02+5:302015-01-05T23:13:02+5:30
कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़

कोळसा कामगारांचे कामबंद
वणी : कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़ या आंदोलनामुळे वेकोलिच्या १५ खाणींमधील उत्पादन ठप्प पडणार आहे. परिणामी शासनाचे कोट्यधींचे उत्पन्न बुडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोल इंडियाअंतर्गत प्रमुख चार कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. या चारही कंपन्यांमधील कोळसा कामगारांच्या विविध मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी कामगारांनी वारंवार निवेदन दिले. अनेकदा आंदोलनेही केली आहेत. मात्र अद्याप कामगारांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आता कामगारांचा संयम संपत आहे. त्याच अनुषंगाने आता चारही कंपन्यांमधील पाच प्रमुख कामगार संघटनांनी एकत्रित येऊन ६ जानेवापीरपासून पाच दिवसीय कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.
कोळसा कंपनीद्वारे खुल्या बाजारात कोळसा विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. ती समाप्त करावी, अशी कामगारांची मागणी आहे. सोबतच कोळसा ब्लॉक कोल इंडियाला देण्यात यावे, कोल इंडियाचे शेअर विक्री करू नये, कोल इंडियामध्ये ई-अॅक्शन पध्दत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, कोळसा विक्री मूल्य उत्पादन खर्चावर आधारित समिती गठित करून पाच प्रमुख कामगार संघटनांचा त्यात समावेश करावा, नवीन कामगार भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू करावी, रिक्त पदे तातडीने भरावी व कंत्राटदारी, आऊटसोसिंग पध्दत बंद करावी, अशा मागण्या आहेत.
याशिवाय नवीन भूमी अधिग्रहण कायदा पूर्ण रूपात लागू करावा, कामगारांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी, पदवी, पदविकाधारक, आयटीआय उत्तीर्ण कामगारांना बढती द्यावी, आदी मागण्याही कामगारांनी केल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मागण्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी कामगारांची अपेक्षा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता प्रमुख पाच कोळसा कामगार संघटनांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
यापूर्वी केवळ सन १९८७ मध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांनी संप केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रात काँग्रेस आढाडीचे सरकार असताना सतत चार दिवस देशभर कोळसा खाण बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खुद्द काँग्रेसप्रणीत इंटक ही युनियनही संपात सहभागी झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने नमते घेतले होते. मात्र आता सत्ता बदल झाला आहे. त्यामुळे पुन्हा जुनीच परिस्थिती समोर निर्माण झाली आहे.
सध्या केंद्रात भाजपा युतीचे सरकार सत्तारूढ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने ‘सबका साथ- सबका विकास‘, अशी ग्वाही दिली होती. मात्र सत्तेवर येताच केंद्र सरकारने कोळसा कामगारांच्या हिताविरुद्ध कार्य सुरू केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळेच भाजपाप्रणीत बीएमएस ही कामगार संघटनासुद्धा या देशव्यापी पाच दिवसीय कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व कोळसा गाणींतील कोळसा उत्पादन ठप्प पडणार आहे. परिणामी वीज केंद्रांना कोळसा मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे देशात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीच यावर काही तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)