ऊसतोड कामगार निघाले कारखान्याकडे
By Admin | Updated: November 6, 2016 00:25 IST2016-11-06T00:25:46+5:302016-11-06T00:25:46+5:30
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत.

ऊसतोड कामगार निघाले कारखान्याकडे
गाव, वाड्या, तांडे ओस : ४० हजारांवर मजूर रवाना
पुसद : साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत. दिवाळीनंतर तांडे, वाड्या, वस्त्यांत कारखान्याला जाण्यासाठी मजुरांची लगबग झाली असून मजुरांना निरोप देण्यासाठी कुटुंब रस्त्यावर थांबलेले दिसतात. आतापर्यंत हजारो मजूर ऊस तोडणीसाठी गेल्याने तालुक्यातील तांडे-वाडे ओस पडली आहे.
यावर्षी काही भागात चांगला पाऊस झाला तर काही भागात कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसायही संकटात आला आहे. त्यामुळे कुटुंबासह ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतर करीत असल्याचे दिसत आहे. शेकडो मजूर स्थलांतर झाल्याने या ऊसतोड कामगारांच्या पाल्याचे शिक्षणही बुडण्याची शक्यता आहे. पुसद तालुक्यात अनेक गावाहून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा ठिकाणी कामाला जात आहेत. चार ते पाच महिने पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांना आपल्या कुटुंबासह जातात. ऊसतोड मजुरांचे आठ ते पंधरा दिवसात या गावाहून त्या गावाला कामगारांचा टोळ्याचे स्थलांतर होत असल्याने तसेच अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ट्रक, ट्रॅक्टर तालुक्यातील वाड्या व रस्त्यांवर हजर होतात. मजुरांच्या स्थलांतरामुळे बाजारपेठेवर परिणाम जाणवणार आहे. परंपरागत असलेल्या ऊसतोडीचा धंदा थांबता थांबत नाही. बारमाही बायागतीचा तालुक्यात अभाव असल्याने मजूर दरवर्षी बाहेर जात आहे. स्थलांतरित मजुरांचा आकडा समोर आला नसला तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातून ४० हजाराच्यावर ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्थानिक कापूस उत्पादकांची होणार कोंडी
तालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहेत. चांगल्या रोजगाराच्या शोधात दरवर्षी मजुरांचे कुटुंबच्या कुटुंब स्थालांतरित होते. परंतु, या स्थलांतरामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते. तालुक्यात उसाप्रमाणेच कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील मजूर मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.