आरोग्य केंद्राचे काम रखडले
By Admin | Updated: December 20, 2014 22:48 IST2014-12-20T22:48:10+5:302014-12-20T22:48:10+5:30
सामान्य जनतेपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, या हेतूने शासनाने पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील वेगाव येथे तब्बल तीन कोटी रूपयांचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूसाठी मंजूर केला.

आरोग्य केंद्राचे काम रखडले
मारेगाव : सामान्य जनतेपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, या हेतूने शासनाने पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील वेगाव येथे तब्बल तीन कोटी रूपयांचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूसाठी मंजूर केला. तथापि विविध अडचणींमुळे आजतागायत या वास्तूचे बांधकाम पूर्ण न झाल्याने या भागातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषदेने गेल्या पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील वेगाव परिसरातील आरोग्य सुविधांचा बिकट प्रश्न लक्षात घेऊन वेगाव येथे तब्बल तीन कोटी रूपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची आपल्याच परिसरात आरोग्याच्या सुविधा मिळणार, अशी आशा पल्लवीत झाली होती. मात्र प्रत्यक्षात वास्तूचे बांधकाम हाती घेताच अनेक अडचणी निर्माण झाल्या.
प्रथम नियोजित वास्तूच्या जागेपर्यंत बांधकाम साहित्य नेण्यास रस्ता नसल्याचे कारण सांगून अनेक दिवस हे काम रखडले. निधी असूनही कामाला सुरूवात झालीच नाही. शेवटी मोठ्या प्रयासाने काम सुरू झाल्यानंतर स्लॅबपर्यंत वास्तूचे काम आल्यानंतर बांधकाम कंत्राटदाराने अचानक बांधकामच बंद केले. तेव्हापासून या वास्तूचे काम अर्धवट स्थितीत बंदच पडलेले आहे.
या संदर्भात सरपंच व ग्रामस्थांनी दोनदा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निवेदन देण्यात आले.
तथापि अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून ग्रामस्थांना केवळ आश्वासने मिळाली. प्रत्यक्षात पुढील बांधकामाला सुरूवातच झाली नाही. आता ग्रामस्थांनी पुन्हा अधिकारी आणि प्रतिनिधींना निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)