मजुरांअभावी शेतीची कामे ठप्प
By Admin | Updated: June 7, 2017 00:57 IST2017-06-07T00:57:13+5:302017-06-07T00:57:13+5:30
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहला असताना अनेक शेतकऱ्यांची शेतातील कामे

मजुरांअभावी शेतीची कामे ठप्प
शेतकरी त्रस्त : मनासारखी रक्कम देवूनही शेतीकामासाठी मजूरच मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहला असताना अनेक शेतकऱ्यांची शेतातील कामे मजुरांअभावी तशीच पडून आहेत. मजूर मिळत नसल्याने आता काय करावे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
पुसद परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेतीची नांगरणी, खत टाकणे आदी कामे तशीच पडून आहेत. काही शेतकऱ्यांची मजुरांअभावी कपाशीचे उभे पीक तसेच दिसत आहे. पूर्वी शेतातील कापूस उपटण्यासाठी एकरी पाचशे रुपये दिले जात तर काही ठिकाणी सरपण म्हणून मोफत उपटले जात. सध्या एकरी दोन हजार रुपये देवूनही मजूर मिळेना. मागील वर्षी महिलांना १०० ते १५० रुपये व पुरुषांना २०० रुपये रोज होता. मात्र आता महिलांना १५० ते २०० रुपये आणि पुरुषांना २५० ते ३५० रुपये रोज द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.
ज्वारी, गहू, बाजरी, मका, मूग या पिकांना दहा वर्षापूर्वी जो भाव होता त्या भावात काहीच फरक पडलेला नाही. लागवडीवरील खर्चाच्या मानाने तो परवडत नाही तर दुसरीकडे बियाणे व खतांमधूनही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येते. पैसे देऊनही खात्रीचे बियाणे व खते मिळेल, याची काहीच खात्री नाही. यावर्षी समाधानकारक पाऊस होणे आवश्यक आहे.