महिलांनी ठोकले नगरपरिषदेला कुलूप

By Admin | Updated: June 26, 2014 00:03 IST2014-06-26T00:03:08+5:302014-06-26T00:03:08+5:30

आठवडाभरापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना पाणी देण्यास आर्णी नगरपरिषद अपयशी ठरल्यानंतर बुधवारी संतप्त महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत चक्क नगरपरिषदेलाच कुलूप ठोकले.

Women locked the Municipal Council | महिलांनी ठोकले नगरपरिषदेला कुलूप

महिलांनी ठोकले नगरपरिषदेला कुलूप

आर्णी : पाणीपुरवठा बंद असल्याने संताप
आर्णी : आठवडाभरापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना पाणी देण्यास आर्णी नगरपरिषद अपयशी ठरल्यानंतर बुधवारी संतप्त महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत चक्क नगरपरिषदेलाच कुलूप ठोकले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या संतापाचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले.
शहरातील गांधीनगर या भागात गेल्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. नगरपरिषदेच्यावतीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना होत नसल्यामुळे येथील महिलांना पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या एक आठवड्यापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची ही समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे येथील महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. यावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयात महिलांच्या समस्या ऐकून घ्यायला कुणीच नव्हते. त्यामुळे महिलांच्या संतापात अधिकच भर पडली. अखेर आपल्या न्याय मागण्यांसाठी संतप्त महिलांनी नगरपरिषदेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून नगरपरिषद समोरच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला.
दरम्यान, महिलांनी आंदोलन केल्याचे समजताच नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आरिज बेग, नगरसेवक छोटू देशमुख, शेखर लोळगे, विशाल ठाकरे, रमेश ठाकरे, गणेश हिरोळे घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्या महिलांच्या समस्या उपाध्यक्ष आरिज बेग यांनी ऐकून घेतल्यानंतर आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women locked the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.