महिलेचा खून आर्थिक वादातून
By Admin | Updated: June 2, 2017 01:43 IST2017-06-02T01:43:17+5:302017-06-02T01:43:17+5:30
शहरातील सूरजनगर परिसरात महिलेचा खून आर्थिक वादातून झाल्याचे उघड झाले असून आरोपीने पोलिसांसमोर

महिलेचा खून आर्थिक वादातून
आरोपीचे आत्मसमर्पण : टोळीविरोधी पथकाने घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील सूरजनगर परिसरात महिलेचा खून आर्थिक वादातून झाल्याचे उघड झाले असून आरोपीने पोलिसांसमोर कारंजा येथे आत्मसमर्पण केले.
सूरज नंदकिशोर भोसले (२९) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, असे आरोपीचे नाव आहे. त्याने २८ मे रोजी पहाटे २.३० वाजता पपिता निलध्वज कांबळे (३९) यांचा कैचिने खून केला होता. सूरजची आई व पपिता भोसा येथील एकाच फॅक्ट्रीत कामाला होत्या. येथूनच त्याची पपितासोबत ओळख झाली. यातून आर्थिक व्यवहार झाले. त्यामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर त्याने पपिताचा खून केल्याचे कबूल केले.
२७ मेच्या सायंकाळपासून तो पपिताच्या घरात होता. नंतर पहाटेच्या सुमारास त्याने पपिताचा खून केला. त्यानंतर तो पायदळ विदर्भ हाऊसिंग परिसरातील एका मैदानात थांबला. तेथून घरी आल्यानंतर २८ मे रोजी सायंकाळी त्याने अमरावती गाठले. तेथून मित्राच्या वाहनावर चालक म्हणून तो नाशिकला गेला. ही माहिती वडगाव रोड ठाण्यातील शोध पथकाला मिळाली. टोळीविरोधी पथकलाही त्याचा सुगावा लागला. दोन्ही पथकांकडून त्याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करणे सुरू होते. तो यवतमाळात परत येत असतानाच त्याला कारंजा येथून टोळीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले.
एसडीपीओंनी मांडले ठाण
या खुनाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप सायबर सेलमध्ये ठाण मांडून होते. त्यांनी टोळीविरोधी पथक, वडगाव रोडचे शोध पथक आणि एसडीपींओचे पथक कामी लावले होते.