महिलेचा मृतदेह ३६ तास अंत्यविधीसाठी ताटकळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:07+5:30
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना तालुक्यातील शिंगणापूर गावात रविवारी घडली. शिंगणापूर येथे शनिवारी सायंकाळी जिजा अरुण राऊत यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांनी मृत्यूपर्वी दोनदा आरटीपीसीआर तपासणी केली. या तपासणीमध्ये त्या कोरोना निगेटिव्ह आल्या; परंतु उपचरादरम्यान त्या घरीच मृत्यू पावल्या. गावकऱ्यांनी मात्र ही महिला कोरोनाबाधित असल्याची धारणा करून घेतली होती.

महिलेचा मृतदेह ३६ तास अंत्यविधीसाठी ताटकळला
गजानन अक्कलवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : कोरोना आणखी किती वाईट दिवस दाखविणार कुणास ठाऊक? कोरोनाची भीती इतकी वाढली आहे की, साध्या आजाराने दगावलेल्या व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला लोक घाबरू लागले आहेत. याच अनाठायी भीतीमुळे रविवारी एका महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ३६ तास ताटकळत राहिला. तिरडीला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शेवटी प्रशासनाने हस्तक्षेप करून या महिलेला अखेरचा निरोप दिला.
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना तालुक्यातील शिंगणापूर गावात रविवारी घडली. शिंगणापूर येथे शनिवारी सायंकाळी जिजा अरुण राऊत यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांनी मृत्यूपर्वी दोनदा आरटीपीसीआर तपासणी केली. या तपासणीमध्ये त्या कोरोना निगेटिव्ह आल्या; परंतु उपचरादरम्यान त्या घरीच मृत्यू पावल्या. गावकऱ्यांनी मात्र ही महिला कोरोनाबाधित असल्याची धारणा करून घेतली होती. विशेष म्हणजे जिजा ज्या दिवशी मृत्यू पावल्या, त्याच दिवशी त्यांचे पती अरुण राऊत हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिजा राऊत यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील कोणीही पुढे यायला तयार नव्हते.
अंत्यसंस्काराचा पेचप्रसंग निर्माण झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, बीडीओ पद्माकर मडावी, टीएचओ डॉ. विजय आकोलकर यांना देण्यात आली. त्यांनी लगेच शासकीय यंत्रणेला कामी लावले. यासाठी ग्राम दक्षता समितीला सक्रिय करण्यात आले. शेवटी गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला. गावकऱ्यांची समजूत काढण्यात सरंपच किरण येरमे, तलाठी पी. डी. तिरळे, ग्रामसेवक सुजित थुल, पोलीस पाटील गजेंद्र झोड, आशा स्वयंसेविका ताई वड्डे यांना यश मिळाले.
कीट घालून अंत्यसंस्कार
पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर गावकरी अंत्यसंस्कारासाठी राजी झाले. अखेर मृत आत्म्याला खांदेकऱ्यांची असलेली प्रतीक्षा संपली.