कपडे धुण्यासाठी गेलेली महिला तलावात बुडाली
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:01+5:302015-12-05T09:09:01+5:30
गावाशेजारील तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ...

कपडे धुण्यासाठी गेलेली महिला तलावात बुडाली
पुसद : गावाशेजारील तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव (बंगला) येथे घडली. बुडालेल्या महिलेच्या अंगावर जखमा पाहता तिचा घातपात की अपघात अशा शंकांना पेव फुटले आहे.
वर्षा हिरामण चव्हाण (२५) रा. सावरगाव बंगला असे मृत महिलेचे नाव आहे. वर्षा गावाशेजारी असलेल्या पाझर तलावावर सकाळी कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ झाल्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिचा शोध घेत तलाव गाठला. त्यावेळी चपला व धुण्यासाठी नेलेले कपडे तलावाच्या काठावर आढळून आले. त्यानंतर चार ते पाच जणांनी तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती गावात होताच बघ्यांनी तलावावर मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, वर्षाचा सासरा मोहन चव्हाण यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृत वर्षाच्या गळ्यावर आणि हातावर जखमा आढळून आल्या असून तोंडातून रक्त बाहेर येत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे तिचा घातपात की अपघात अशा शंकांचे पेव फुटले आहे. (प्रतिनिधी)