निर्माल्य विसर्जित करताना दोन चिमुकल्यांसह महिलेचा बुडून मृत्यू

By विलास गावंडे | Published: April 13, 2024 08:25 PM2024-04-13T20:25:44+5:302024-04-13T20:25:51+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील कवठाबाजारची घटना : सख्ख्या बहिणी अन् काकूचा मृतदेहच निघाला बाहेर

Woman drowns with two small children during Nirmalya immersion | निर्माल्य विसर्जित करताना दोन चिमुकल्यांसह महिलेचा बुडून मृत्यू

निर्माल्य विसर्जित करताना दोन चिमुकल्यांसह महिलेचा बुडून मृत्यू

आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील कवठाबाजार येथे एका कुटुंबातील महिला निर्माल्य वाहण्यासाठी गावातील पैनगंगा नदीकाठावर पाेहाेचल्या. येथे निर्माल्य विसर्जित करताना एका चिमुकलीचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिची बहीण व काकू सुद्धा पाण्यात काेसळली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. तिघींचेही मृतदेह हाती लागले.

प्रतीक्षा प्रवीण चौधरी (३५), अक्षरा निलेश चौधरी (११), आराध्या निलेश चौधरी (८) अशी मृतांची नावे आहेत. या तिघी घरातील पूजेतून आलेले निर्माल्य विसर्जित करण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात गेल्या. तिथे निर्माल्य विसर्जित करत असताना आराध्याचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण अक्षरा व काकू प्रतीक्षा पुढे सरसावल्या, मात्र त्यांचाही घात झाला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. नदीपात्रात रेती उत्खनन केल्यामुळे माेठ-माेठे खड्डे पडले आहेत. यातच तिघीही बुडाल्या. ही बाब नदी तीरावर असलेल्या इतरांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली. ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ताेपर्यंत तिघीही पाण्यात बुडाल्या हाेत्या. अखेर तिघींचेही मृतदेहच हाती लागले. या घटनेने गावात शाेककळा पसरली आहे.

रेती माफियामुळे नदी उठली जीवावर

पैनगंगा नदी पात्रातून दिवसरात्र रेतीचा उपसा केला जाताे. त्यासाठी रेती माफियांकडून ट्रेझर बाेट, जेसीबी, पाेकलँड मशिनरीचा वापर केला जाताे. यामुळे नदीपात्रात अक्षरश: विहिरीच्या आकाराचे विवर तयार झाले आहेत. यात पाण्याचा प्रवाह फिरत असल्याने तेथे अंदाज येत नाही. यातूनच शनिवारीची भीषण घटना घडल्याचे कवठाबाजार ग्रामस्थांनी सांगितले. तिघींचा मृत्यू झाल्याने रेती तस्कर व स्थानिक प्रशासनाविराेधात गावकऱ्यांनी आपला राेष व्यक्त केला.

Web Title: Woman drowns with two small children during Nirmalya immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.