महिला डॉक्टरने हाणली वृद्धेच्या कानशिलात
By Admin | Updated: June 6, 2017 01:23 IST2017-06-06T01:23:33+5:302017-06-06T01:23:33+5:30
रसूतीसाठी मुलीला घेऊन आलेल्या वृद्ध मातेला महिला डॉक्टरने मारहाण केल्याची संतापजनक घटना येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी सायंकाळी घडली.

महिला डॉक्टरने हाणली वृद्धेच्या कानशिलात
शासकीय ‘मेडिकल’ची घटना : तक्रार केल्यास उपचार थांबविण्याची डॉक्टरची धमकी
सुरेंद्र राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रसूतीसाठी मुलीला घेऊन आलेल्या वृद्ध मातेला महिला डॉक्टरने मारहाण केल्याची संतापजनक घटना येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी सायंकाळी घडली. वृद्धेच्या कानशिलात हाणल्यानंतर तक्रार केल्यास उपचार थांबविण्याची धमकी त्या डॉक्टरने दिली. यामुळे घटनेची वाच्छता कुठेच झाली नाही. अखेर आशा स्वयंसेविकेच्या सतर्कतेने हा प्रकार पुढे आला. मात्र ‘मेडिकल’ प्रशासनाने वृत्तलिहिस्तोवर साधी कारवाईही केली नव्हती.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती वार्डात सुनीता राजू वाकडकर (२५) रा. गोटमारबोरी ता. मारेगाव ही महिला बाळंतपणासाठी दाखल झाली. तिच्यासोबत वृद्ध आई माया तुकाराम बावणे होत्या. रविवारी सायंकाळी प्रसूतीसाठी टेबलवर घेण्यात आले. त्यावेळी तेथे झालेली घाण कर्मचाऱ्याच्या सूचनेवरून कापसाच्या बोळ्याने मायाबाईने स्वच्छ केली आणि तो बोळा एका डब्ब्यात टाकला. त्याच वेळी तेथे उपस्थित महिला डॉक्टरने वाद घालत चक्क मायाबाईच्या कानशिलात मारली. हा प्रकार कुणाला सांगितल्या आणि तक्रार केल्यास उपचार करणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिला कक्षाबाहेरही हाकलून दिले. उपचार होणार नाही या भीतीने हा प्रकार त्यांनी कुणालाही सांगितला नाही. परंतु बाळंतपणासाठी रुग्णालयात घेऊन येणाऱ्या आशा स्वयंसेविकेने यावर जाब विचारला. तिलाही शिवीगाळ करत हाकलून दिले.
दरम्यान सोमवारी सकाळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्याकडे तक्रार केली. परंतु त्यांनीसुद्धा दखल घेतली नाही. आशा स्वयंसेविकेने सतर्कता दाखविली नसती तर हा प्रकारही नेहमीप्रमाणे दडपला गेला असता. प्रस्तूत प्रतिनिधीने प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत वऱ्हाडे यांच्याशी रविवारी रात्री संपर्क साधला. परंतु त्यांनी या घटनेबाबत हातवर केले. मारहाणीचा प्रकार घडला नाही. प्रसूतीगृहातील कामकाज सुरळीत असल्याचे सांगितले. तर आयएमएचे सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी मारहाण झाली असेल तर हा प्रकार निंदनीय आहे. डॉक्टरांनीसुद्धा संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मायाबाई म्हणते, गरीब हायं म्हणून कोणी मारावं का
‘आमाले काय समजते. गरीब हायं म्हणून कोणी मारावं का. मी त्या डाक्टरीनबाईच्या आईच्या वयाची हायं. मायी पोरगी तळमळत होती. हे पाहून जीव खालीवर होत होता. तेथल्या बाईनं सांगितल्यानं कापसाचा बोया डब्ब्यात फेकला. एवढूशासाठी डाक्टरीन बाईनं मले मारलं. वरून औषध देणार नाही, असं धमकावलं’, असे मायाबाई बावणे यांनी सांगितले.
प्रसूतीगृहात रुग्ण महिलेच्या आईला डॉक्टरांकडून मारहाण झाल्याची तक्रार सोमवारी सकाळी प्राप्त झाली. अद्याप त्या महिला डॉक्टरला चौकशीसाठी बोलाविले नाही. चौकशी करून कारणेदाखवा नोटीस बजावण्यात येईल.
- डॉ. अशोक राठोड, अधिष्ठाता.