गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 01:27 PM2022-01-27T13:27:19+5:302022-01-27T13:48:50+5:30

रोज होणाऱ्या वादातून कंटाळून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला होता.

woman arrested for killing mother-in-law by gun firing over small fights | गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम

गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम

Next
ठळक मुद्देपाण्याच्या भरण्यावर तालीम कमरेला रिव्हॉल्वर खोचून होती संधीच्या शोधात

यवतमाळ : सासूसोबत रोज होणाऱ्या कुरबुरीला कंटाळून सुनेने थेट बंदुकीने गोळी झाडून सासूला कायमचे संपवून टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमागील अनेक धक्कादायक प्रकार आता पुढे येऊ लागले आहेत. सासूवर गोळी झाडण्यापूर्वी सुनेने चोरून आणलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्याचा सराव केला.

घरातच पाणी भरलेल्या भरण्यावर तिने गोळी झाडली. पोलिसांच्या झडतीमध्ये भरण्यात फसलेली गोळी मिळाली आहे. सोमवारी आरोपी सुनेला अटक केली आहे. तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी तिच्याकडून घटनास्थळावर गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करवून घेतले.

सरोज अरविंद पोरजवार (२८) या सुनेने सासूची हत्या करण्यासाठी अनेक प्रकारचे कट रचले. सासू वारंवार टोकत असल्याचा तिला कंटाळा आला. यातूनच ती सासूला संपविण्याची संधी शोधत होती. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी सरोजने झोपून असलेल्या सासूला लोखंडी रॉडने मारहाण केली. बरेचदा ती सासूला झोपेतही चापटा मारीत हाेती. सासूबद्दल सरोजच्या मनात प्रचंड तिरस्कार होता. यासाठी तिने शेजारी राहणाऱ्या निवृत्त तुरुंग अधिकाऱ्याच्या घरून रिव्हॉल्व्हर चोरली. या रिव्हॉल्व्हरमध्ये सात राउंड होते. त्यापैकी एक राउंड सरोजने पाण्याच्या भरण्यावर फायर केला व दुसरा राउंड सासूच्या मानेच्या मागे फायर केला. उर्वरित पाच राउंड रिव्हॉल्व्हरमध्ये आढळून आले.

भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा अरविंद हा पत्नी सरोज हिच्या कृत्यापासून अनभिज्ञ होता. रोजची कुरबुर एवढे भीषण रूप धारण करेल याची कल्पना त्याला आली नाही. सरोजने २१ जानेवारीला प्रभू गव्हाणकर यांच्या घरून रिव्हॉल्व्हर चोरली. ही रिव्हॉल्व्हर हाताळताना चूक होऊ नये म्हणून सरोजने गोळी झाडण्याचा सराव केला.

या सर्व घटनेची तिने पोलिसांकडे कबुली दिली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा सरोजची मुलगी अनुष्का (१२), मुलगा क्रिष्णा उर्फ डुग्गू (६) हे दोघेही घरात होते. त्यांनी घरात पाण्याची बाटली फुटल्यासारखा आवाज आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. घटनास्थळी सोमवारी रात्री १०.३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, आर्णी ठाणेदार पितांबर जाधव उपस्थित होते.

सरोजच्या बेदरकारीने पोलीस अचंबित

गोळी झाडून सासूची हत्या केल्यानंतरही सरोज काहीच न झाल्याचा भाव आणून वावरत होती. तिने आर्णीवरून सासूला यवतमाळला आणले. पोलिसांनी वारंवार चौकशी करूनही ती सहज सांगण्यास तयार नव्हती. शवचिकित्सा अहवालाने बिंग फुटल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिचा बेदरकारपणा पाहून पोलीसही अचंबित झाले.

चोरीनंतर घरझडतीत झाली हयगय

निवृत्त तुरुंग अधिकाऱ्याची रिव्हाॅल्वर चोरी गेली. याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली नाही. स्थानिक पोलिसांनी परिसरातील घरांची झडती घेताना हयगय केली. त्यामुळेच सरोजने घरात दडून ठेवलेली रिव्हाॅल्वर पोलिसांच्या हाती लागली नाही. पुढे याच रिव्हॉल्वरचा वापर करून सासूचा खून झाला.

संबंधित बातमी - खळबळजनक घटना; जेलरची रिव्हॉल्वर चोरून सुनेने केला सासूचा गेम

Web Title: woman arrested for killing mother-in-law by gun firing over small fights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.