प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच काँग्रेस जिल्हा कार्यालयाविना
By Admin | Updated: July 1, 2014 00:51 IST2014-07-01T00:51:03+5:302014-07-01T00:51:03+5:30
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात काँग्रेस कार्यकर्त्यांना हक्काचे व मालकीचे जिल्हा कार्यालयच नाही. आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच काँग्रेस जिल्हा कार्यालयाविना
यवतमाळ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात काँग्रेस कार्यकर्त्यांना हक्काचे व मालकीचे जिल्हा कार्यालयच नाही. आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांना हक्काचे कार्यालय हवे याची जाणीव होऊ लागली आहे.
काँग्रेसचे आमदार वामनराव कासावार यांच्या आर्णी रोड स्थित बंगल्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसने जिल्हा कार्यालय थाटले आहे. पक्षाचे सर्व कार्यक्रम, बैठका, प्रचार तेथूनच चालायचा. परंतु कासावार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान दोन-तीन दिवसांपासून या कार्यालयाला सातत्याने कुलूप दिसत आहे. कार्यालयावर नामफलक अथवा पक्षाचा ध्वजही दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हुरहूर पहायला मिळत आहे. राजीनाम्यानंतर कासावारांनी तर या कार्यालयाला कुलूप लावले नाही ना, अशी चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष असे, पक्षांतर्गत विरोधामुळे कासावारांनी जिल्हाध्यक्ष पद सोडले. आता कार्यकर्त्यांनाही कासावारांच्या बंगल्यात असलेल्या या पक्ष कार्यालयात जाताना तेवढा हक्क वाटत नाही. त्यामुळेच पूर्वी प्रमाणे कुणी कार्यकर्ता जोशात या कार्यालयाकडे फिरकला नाही. याच कार्यालयात आता दवाखाना थाटला जाणार असल्याची चर्चाही काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे.
जिल्ह्यात काँग्रेसला हक्काचे व मालकीचे कार्यालय नाही, ही बाब प्रत्येकालाच मान्य आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे माणिकराव ठाकरेंच्या रुपाने गेली सहा वर्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे. परंतु एवढ्या वर्षात त्यांना आपल्या गृहजिल्ह्यासाठी पक्षाच्या मालकीच्या कार्यालयाची निर्मिती करता आलेली नाही. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यातील सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्याकडे सतत लालदिवा आहे. त्यानंतरही या नेत्यांना यवतमाळ जिल्ह्यासाठी पक्षाचे हक्काचे कार्यालय एवढे वर्षात थाटता आलेले नाही. सत्तेतील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकट्या यवतमाळात दोन ते तीन कार्यालये आहेत. त्या तुलनेत काँग्रेसची अवस्था वाईट मानली जाते. पाच आमदार आणि खुद्द महाराष्ट्राचे अध्यक्षपद यवतमाळात असताना एक जिल्हा कार्यालय या नेत्यांना थाटता येऊ नये, यातच त्यांचे अपयश दडलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)