वणी, झरी तालुक्यात वादळी पावसाचे थैैमान

By Admin | Updated: June 6, 2017 01:29 IST2017-06-06T01:29:28+5:302017-06-06T01:29:28+5:30

रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाने सर्वांचीच दाणादाण उडविली.

Wind, thunderstorms in Jhari taluka | वणी, झरी तालुक्यात वादळी पावसाचे थैैमान

वणी, झरी तालुक्यात वादळी पावसाचे थैैमान

वीज खांब वाकले, तारा तुटल्या : अनेकांच्या घरावरील छपरे उडाली, अर्धे शहर रात्रभर अंधारात
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाने सर्वांचीच दाणादाण उडविली. वादळाने अनेकांच्या घरावरील छपरे उडून नेली. रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने वणी-घोन्सा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. वीज वितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले. शहरात आठ ते १० वीज खांब उन्मळून पडल्याने रविवारी सायंकाळी खंडित झालेला वणी शहरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपारनंतर सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैैरसोय झाली.
मागील आठवड्यात २७ व २८ मे रोजी सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले असताना रविवारी ३ जुनला सायंकाळी वणी परिसरात चहुबाजूने घोंगावत आलेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. यादरम्यान गारपिटही झाली. गणेशपूर भागातील छोरीया ले-आऊटमध्ये बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांसाठी टिनाचे शेड उभारून बांधण्यात आलेले निवारे वादळाच्या तडाख्यात सापडून उडून गेले. यावेळी कामगार त्या शेडमध्येच कुटुंबासह थांबून होते. मात्र या कामगारांनी प्रसंगावधान राखून आपल्या कुटुंबासह समोरच नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीत आसरा घेतला. सुदैैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. यासोबतच या भागात असलेल्या कडूनिंबाच्या एका झाडाचा अर्धा भाग तुटून खाली पडला. अनेकांच्या घरावरील पाण्याच्या टाक्यादेखील उडून गेल्या. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
वणी शहरात अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे उन्मळून पडलीत. त्यामुळे वीज तारा तुटल्या. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी परिसरात पुन्हा वादळी पाऊस झाला. त्यात वणी -घोन्सा मार्गावर झाड उन्मळून पडले. परिणामी सुमारे दिड तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दोनही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिड तासानंतर हे झाड रस्त्यावरून हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने वणी शहरातील एसपीएम शाळेत एक वर्षापूर्वी तयार केलेले टिनाचे शेड उडून गेले. वणी-भालर मार्गावर मोठे निंबाचे झाड उन्मळून पडल्याने रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. रविवारच्या वादळानंतर रात्रभर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झुंजत होते. त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा सुरू झाला. मात्र वादळामुळे अनेक ठिकाणी मोठा तांत्रिक बिघाड व काही ठिकाणी खांब उन्मळून पडल्याने तांत्रिक बिघाड दुरूस्त करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. सोमवारी सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम सुरूच होते.

Web Title: Wind, thunderstorms in Jhari taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.