पत्नीच्या खुनात पतीला जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Updated: June 15, 2017 00:58 IST2017-06-15T00:58:50+5:302017-06-15T00:58:50+5:30
अंगणात निद्रेच्या अधीन गेलेल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

पत्नीच्या खुनात पतीला जन्मठेपेची शिक्षा
किन्हाळाची घटना : चाकूने भोसकले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अंगणात निद्रेच्या अधीन गेलेल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
विजय नारायण राठोड रा. किन्हाळा ता. कळंब, असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. विजय सातत्याने पत्नी अनिताचा छळ करीत होता. तिला नेहमी शिविगाळ करून मारझोड करीत होता. या जाचाला कंटाळून अनिता ३ आॅक्टोबर २०१४ रोजी माहेरी गेली. राग शांत होताच लगेच ती किन्हाळा येथे परत आली. त्याच रात्री सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ती घराच्या अंगणात निद्रेच्या अधीन झाली. अनिता झोपेत असतानाच अचानक विजयने तिच्यावर चाकूने हल्ला करून भोसकले. यात तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अनिताचे वडील पुनाजी जाधव यांच्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी विजयविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक गजानन खारडे यांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. सी. मोरे यांनी प्रत्यक्षदर्शी अनिताच्या आईची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. निती दवे यांनी बाजू मांडली.