उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:31 IST2025-02-20T18:30:56+5:302025-02-20T18:31:27+5:30
Yavatmal : उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे

Why do you need nitrogen in your car tires in the summer?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाहनातील टायरमध्ये कॉम्प्रेसरच्या माध्यमातून भरल्या जाणारी हवा आणि नायट्रोजन हवा यात मोठा फरक आहे. कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा ही सर्वाधिक थंड आहे. यामुळे वाहन कितीही वेगात आणि कितीही वेळ चालविले तर टायर गरम येत नाही. परिणामी टायर फुटण्याचा धोका नसल्यासारखाच असतो.
यामुळे चारचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी नायट्रोजन हवा ही सर्वाधिक सुरक्षित हवा मानली जाते. त्याच प्रमाणे दुचाकी वाहनातही नायट्रोजन हवा भरली तर हवा लवकर उतरत नाही. यामुळे दुचाकी वाहनाचा टायर फुटण्याचा धोका कमी होतो. गाडी चालविताना त्यात डिझेल किंवा पेट्रोल यावर लक्ष दिले जाते. मात्र गाडीला असलेल्या टायरकडे लक्षच दिले जात नाही. त्यातली हवा उन्हाच्या पाऱ्याने झपाट्याने घटते. अनेकवेळा तर टायर फुटून अपघात होतो. मात्र त्या बाबीकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होते. वेळीच उपाय केले तर होणारा अपघात टाळता येतो. यासाठी वाहनधारकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.
उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे
राज्य मार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामात सिमेंटचा वापर होत आहे. सिमेंट अधिक गरम असते. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याचे वाहन रस्त्यावरून धावत असेल तर टायर गरम येतो. सोबत टायरमधील हवादेखील गरम होते. यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो.
रिमोल्ड टायरचा पर्याय
- मोठा टायर नवीन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ग्राहक अशा टायरला रिमोल्ड केले जाते. खासकरून ट्रॅक्टरचा टायर रिमोल्ड केला जातो. यावर काही काळ वाहन चालविता येते. मात्र त्यातून कायमस्वरूपी पर्याय निघत नाही.
- मोठ्या टायरला रिमोल्ड करता 3 येते. मात्र दुचाकी वाहनाच्या टायरला रिमोल्ड केले तर त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. असे टायर लवकरच फुटतात. दुचाकी वाहनाला रिमोल्डचा पर्याय धोकादायक आहे. यासाठी नवीन टायर शोधावे लागते.
तापमान ३६ अंशांवर
हिवाळ्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान ३६ अंशांपर्यंत वर चढले आहे. पुढील काळात हे ऊन अधिक तापणार आहे. अशा परिस्थितीत अधिक ऊन असल्यामुळे टायरमधील हवा कमी होते. अचानक हवा कमी झाल्यानंतर रस्त्यावरील खाच खळग्यात वाहनांचे मोठे नुकसान होते.
किती किलोमीटरनंतर बदलविणार टायर?
चारचाकी वाहनामध्ये ५० हजार किलोमीटरनंतर टायर बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर टायरवर अधिक दबाव पडण्यास सुरुवात होते. यामुळे एका बाजूने टायर घासल्या जातो. यातून टायर फुटण्याचा धोका वाढतो.