काँग्रेसच्या असंतुष्टांचा बोलविता धनी कोण ?
By Admin | Updated: June 26, 2014 23:31 IST2014-06-26T23:31:34+5:302014-06-26T23:31:34+5:30
काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी प्रस्थापितांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करीत जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांनी अचानक घेतलेली

काँग्रेसच्या असंतुष्टांचा बोलविता धनी कोण ?
वामनराव कासावार घेणार शोध : जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याने राजकीय भूकंप
यवतमाळ : काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी प्रस्थापितांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करीत जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांनी अचानक घेतलेली ही भूमिका कुणाच्याही पचनी पडलेली नाही. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनाही हे आश्चर्यच वाटले. म्हणूनच त्यांनी या असंतुष्ट नेत्यांचा बोलविता धनी कोण ? हे शोधणार असल्याची गर्जना पत्रपरिषदेत केली.
आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याबाबतचा निर्णय गुरुवारी पत्रपरिषदेत जाहीर केला. शिवाय स्वत: किंवा मुलगा विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणाही केली. सोबतच बुधवारी पत्रपरिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांमागे नेमके कोण आहे याचा अभ्यास आपण करणार असल्याचे कासावारांनी पत्रकारांना सांगितले. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्ष गर्भित इशाराच त्यांच्या पक्षातील विरोधक नेत्यांना दिला आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसचे मंत्री, आमदार व नेत्यांचे ‘खासमखास’ म्हणून ओळखले जाणारे पदाधिकारी अचानक जिल्ह्यातील सर्वच नेत्यांबाबत आक्रमक भूमिका घेतातच कसे, याचे कोडे कुणालाही उलगडलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)