जवाबदार कोण? रेल्वेच्या खड्ड्याने घेतला चार मुलांचा जीव : संतप्त जनतेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:38 IST2025-08-22T19:36:22+5:302025-08-22T19:38:08+5:30
चौघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार : हृदयद्रावक घटनेमुळे दारव्हा शहरावर पसरली शोककळा

Who is responsible? A railway pothole took the lives of four children: Angry people's question
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील रेल्वे स्टेशन परिसरात पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी शवविच्छेदन प्रक्रिया आटोपल्यानंतर चारही बालकांचे मृतदेह घरी नेण्यात आले. मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबांनी एकच आक्रोश केला. चारही मातांनी टाहो फोडल्याने उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले होते तर वडील शून्यात हरविल्याचे दिसून आले. या घटनेने संपूर्ण दारव्हा शहर शोकसागरात बुडाले आहे. चारही मुलांवर गुरुवार २१ ऑगस्ट रोजी जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाही.
दारव्हा येथील रेल्वे स्टेशन परिसरातील रिहान असलम खान (वय १३), गोलू पांडुरंग नारनवरे (१०), सोहम सतीश खडसन (१०), वैभव आशिष बोधले (१४) ही चारही मुले बुधवारी शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जातो म्हणून बाहेर गेली होती. मात्र, मुलांसोबतचही ही शेवटची भेट असेल, याची पुसटशीही कल्पना कुटुंबांना नव्हती. रेल्वे स्टेशन परिसरात निर्माणाधीन उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात मुले बुडाल्याचा निरोपच कुटुंबांना मिळाला. स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकष्टा करून चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून यवतमाळ येथे उपचारासाठी नेले. मात्र, चारही मुलांचा मृत्यू झाला.
या घटनेची वार्ता शहरभर पसरताच नागरिकांनी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. आज अंत्यसंस्कारासाठी चारही मुलांच्या घराबाहेर नातेवाईक, मित्रपरिवाराची गर्दी उसळली होती. उपजिल्हा रुग्णालयातून दुपारच्या सुमारास चौघांचेही मृतदेह घरी आणण्यात आले. यावेळी आई-वडिलांसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. रेहान, गोलू, सोहम आणि वैभव या चौघांनाही साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
शाळेला दिली सुटी
सोहम खडसन इयत्ता ७ वी आणि वैभव बोधले इयत्ता २ वीत एडेड शाळेमध्ये शिकत होते. दोघेही नियमित शाळेत जात होते. त्यांच्या मृत्यूने शाळेतील शिक्षक व विद्यार्थी दुःखात बुडाले. गुरुवारी शाळेच्या वतीने दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेला सुटी देण्यात आली.
नातेवाईक संतप्त; दोन तासानंतर मृतदेह घेतले ताब्यात
गुरुवारी सकाळी चारही मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेल्वेच्या कंत्राटदाराने पूल बांधकाम करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने चार निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तब्बल दोन तासानंतर नातेवाईकांची समजूत काढण्यात रेल्वे विभागाच्या अधिकारी व पोलिसांना यश आले.
नियतीचा घाला अन् चार घरांत स्मशानशांतता
नियतीने घाला घातलेल्या चारही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मुलांच्या खेळण्या-बागडण्याने या चारही कुटुंबांच्या घरात कायम आनंद होता. परंतु या दुर्दैवी घटनेने स्मशान शांतता पसरली आहे. चार कुटुंबांच्या घरातील दिवे विझल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
नेर मार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पुलासाठी खोल खड्डा खोदला असून, वाहतूक बाजूच्या रस्त्याने वळविली आहे. खड्याला जाळी बांधणे, सुरक्षा कर्मचारी नेमणे आदी उपाय योजना बांधकाम स्थळी केलेल्या नाहीत. त्यामुळे या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.