एक कोटीचे भोजन खाल्ले कुणी? गौडबंगालची चौकशी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:06 IST2025-03-17T12:51:30+5:302025-03-17T14:06:01+5:30
नेरच्या वसतिगृहात केवळ २४ विद्यार्थी : पुरवठ्याचे आदेशच नाही तर अनुभव प्रमाणपत्र कसे ?

Who ate food worth one crore? The administration is challenged to investigate scam
पवन लताड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती येथील संस्थेने पुसद आदिवासी प्रकल्पातील वसतिगृहांचा भोजन कंत्राट मिळविण्यासाठी नेरच्या वसतिगृहाचे अनुभव प्रमाणपत्र जोडले आहे. त्यात २०१९ ते २०२४ या कालावधीत तब्बल एक कोटी १७ लाख ७१ हजार १२५ रुपयांचा भोजन पुरवठा केल्याचे नमूद आहे. मात्र वसतिगृहात २४ विद्यार्थीच प्रवेशित असून, स्वयंपाकीमार्फत त्यांना भोजन दिले जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या गौडबंगालची चौकशी करण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
पुसद आदिवासी प्रकल्पातील वसतिगृहांच्या भोजन पुरवठ्यासाठी अमरावतीच्या संस्थेला कंत्राट मंजूर करण्यात आले असून, शासनाने सव्वा सात कोटी रुपयांची वित्तीय मान्यताही दिली आहे. मात्र सदर संस्थेने ई-निविदेसोबत जोडलेल्या अनुभव प्रमाणपत्राचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच नेर येथील संस्थेने माहितीच्या अधिकार अर्जाअंतर्गत दिलेल्या माहितीत वसतिगृह अनुदानित असून, २४ विद्यार्थीच प्रवेशित आहे. बाह्यस्रोताद्वारे वसतिगृहाला भोजन पुरवठा होत नाही. साहित्याची खरेदी करून स्वयंपाकीमार्फत भोजन तयार करून विद्यार्थ्यांना दिले जाते, असे म्हटले आहे. दुसरीकडे याच वसतिगृहाला पाच वर्षे भोजन पुरवठा केला असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अमरावतीच्या संस्थेने अपर आयुक्तांना निविदेसोबत सादर केले आहे. त्यात २४ विद्यार्थ्यांना पाच वर्षात एक कोटी १७ लाख ७१ हजार १२५ रुपयांचा भोजन पुरवठा केला असल्याचे नमूद आहे. नेरच्या वसतिगृहाने कुठल्याही संस्थेने भोजन पुरवठा केला नसल्याचे स्पष्ट केले असल्यामुळे अमरावतीच्या संस्थेने अनुभव प्रमाणपत्र आणले कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यमंत्र्यांकडून सहसचिवांना विचारणा
आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी या प्रकरणात तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र ११ मार्चला पुसद प्रकल्पातील भोजन कंत्राटाला वित्तीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर नाईक यांनी सचिव आणि सहसचिवांना फोन करून वित्तीय मान्यतेसंबंधी विचारणा केल्याची माहिती आहे.
आकडे बोलतात
सन रक्कम
२०१९-२० २३८७३८८
२०२०-२१ २६५५८००
२०२१-२२ १८७२९९
२०२२-२३ ३२१५४६९
२०२३-२४ ३३२५१६९