बसस्थानकावर गाड्या ठेवायच्या कुठे ?
By Admin | Updated: February 15, 2016 02:34 IST2016-02-15T02:34:27+5:302016-02-15T02:34:27+5:30
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

बसस्थानकावर गाड्या ठेवायच्या कुठे ?
सुरक्षा वाढविली पण सामान्यांची गैरसोय : बसस्थानकात खासगी वाहनांना ‘नो एन्ट्री’, रस्त्यावर धरपकड
यवतमाळ : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आपली वाहने आत नेणे अशक्य झाले आहे. परंतु, बसस्थानक परिसरात वाहनतळासाठी जागाच नसल्याने गाड्या ठेवायच्या तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यवतमाळ बसस्थानक हे कायम वर्दळीचे ठिकाण आहे. रोज हजारो प्रवाशांची येथे ये-जा असते. परंतु, प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे अशा शहरांसाठी यवतमाळातून राज्य परिवहन महामंडळाची थेट बससेवा आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बहुतांश प्रवासी आॅटोरिक्षाऐवजी नातेवाईकांच्या दुचाकीवर बसूनच बसस्थानकापर्यंत येतात. नातेवाईकांना ‘सोडण्यासाठी’ आलेल्या या नागरिकांना बसस्थानकात कुठेही गाड्या उभ्या कराव्या लागतात. वास्तविक, बसस्थानकात खासगी वाहने नेण्यावर बंधन आहे. पण या ठिकाणी वाहनतळच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे नातेवाईक आपली दुचाकी वाहने परिसरात वाटेल तिथे उभी ठेवतात.
आता तर ही सोयदेखील बसस्थानक प्रशासनाने बाद केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून सुरक्षारक्षकांची संख्या बसस्थानकावर वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बसशिवाय कोणतेही वाहन आत नेणे कठीण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुचाकी बसस्थानकाबाहेर कुठे उभे ठेवावे, हाही प्रश्न आहे. बसस्थानकाच्या बाहेरील परिसरही प्रचंड गर्दीचा आहे. तेथे निट वाहतुकीसाठीही पुरेसा रस्ता उरलेला नाही. अशा ठिकाणी प्रवाशांच्या नातेवाईकांनी गाडी ‘पार्क’ केल्यास हमखास चोरीची शक्यता आहे.
बसस्थानकावर गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्याही घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच दुचाकीची चोरी या ठिकाणाहून झाली. रविवारी एकाच दिवशी दोन सायकली चोरीस गेल्या. परंतु, या चोरीची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचलेली नसल्याने या घटनेचा फारसा गवगवा झालेला नाही. परंतु, चोरीची भीती असलेल्या बसस्थानकावर गाडी नेमकी कुठे उभी करावी, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सुरक्षेसाठी बसस्थानकात खासगी वाहने नेण्यावर बंदी टाकणे योग्यच आहे. मात्र, त्यासाठी वाहनतळाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)