बंद साखर कारखान्यांची चाके पुन्हा फिरणार
By Admin | Updated: June 20, 2014 00:07 IST2014-06-20T00:07:56+5:302014-06-20T00:07:56+5:30
विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली

बंद साखर कारखान्यांची चाके पुन्हा फिरणार
रितेश पुरोहित - महागाव
विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली असून दीर्घ मुदती भाडे तत्वावर साखर कारखाने देण्याची तयारी सुरू आहे. लवकरच दोनही कारखान्यांच्या चिमण्यातून धूर निघण्याची आशा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सहकारातील साखर कारखान्यांना घरघर लागली असून पोफाळी येथील वसंत साखर कारखाना वगळता सर्वच कारखाने बंद पडले आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक साखर कारखाना आणि बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला. काही वर्षापूर्वी या दोनही साखर कारखान्यांना वारणा समूहाने भाडे तत्वावर घेतले. मात्र दोन वर्षांपासून सुधाकरराव नाईक साखर कारखाना आणि तीन वर्षांपासून जयकिसान साखर कारखाना बंद पडला आहे. शेतकऱ्यांची कामधेनू बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्मचारी देशोधडीला लागले आहे. आता दोनही कारखाने सुरू करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे.
साखर कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात १३ जून रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, वारणा समूहाचे विनय कोरे, आमदार विजय खडसे, राज्य बँकेचे प्रशासक अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीत कारखाना दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देऊन सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली. याच बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार सहकार सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त विजय सिंघल, प्रादेशिक सहसंचालक शशी घोरपडे, सुधाकरराव नाईक साखर कारखान्याचे अवसायक जी.एन. नाईक, जयकिसानचे अवसायक सुनील भालेराव, मुख्य सहायक यु.एन. वानखडे यांची १६ जून रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत दोनही कारखान्याचे शासकीय देणे, बँकांचे देणे, व्यापारी, शेतकरी आणि मजुरांचे देणे याचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच भाडेतत्वावर कारखाना देण्यासंदर्भात एक अहवाल सहकार सचिवांना सादर करण्यात आला. यावरून राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्याला मंजुरी मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री कारखान्यांबाबत सकारात्मक असल्याने दोनही कारखाने सुरू होण्याची चिन्हे आहे.
सुधाकरराव नाईक आणि जयकिसान साखर कारखान्याकडे प्रत्येकी १०० कोटींच्या आसपास कर्ज आहे. शासकीय कर्ज माफ करण्याच्या हालचाली असून खासगी देण्यासाठी दीर्घ मुदती वेळ मिळू शकते. तसेच हा साखर कारखाना भाडे तत्वावर दिल्यास त्यांच्याकडूनही कर्जासाठी वसुली केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वारणा समूहाने दोनही साखर कारखाने भाडे तत्वावर घेतले होते. त्यामुळे याच समूहाला साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोनही साखर कारखाने सुरू करण्यासाठी पंजाबराव देशमुख खडकेकर गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांनी यासाठी प्रयत्न केले.