अडीच म्हणजे काय अन् एकोणसत्तर म्हणजे किती ?
By Admin | Updated: June 2, 2017 01:37 IST2017-06-02T01:37:15+5:302017-06-02T01:37:15+5:30
‘अंकल, अडीच रुपये म्हणजे काय?’, ‘पप्पा, एकोणसत्तर म्हणजे किती हो’, असा प्रश्न मुलांनी अनेकदा विचारला असेल.

अडीच म्हणजे काय अन् एकोणसत्तर म्हणजे किती ?
मुलांचे अंकगणित कच्चे : कॉन्व्हेंट संस्कृतीने मराठी अंकगणिताचे वाटोळे
ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘अंकल, अडीच रुपये म्हणजे काय?’, ‘पप्पा, एकोणसत्तर म्हणजे किती हो’, असा प्रश्न मुलांनी अनेकदा विचारला असेल. तुम्ही सहजपणे मराठी अर्थही सांगून जाता. घराघरात नव्हेतर बाजारातही चिमुकल्यांचे असे प्रश्न आता नवीन राहिले नाहीत. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची मराठी अतिशय कच्ची होत आहे. परिणामी व्यावहारिक मराठी शब्दांची जुळवाजुळव करताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यातूनच मग अशा शब्दांचा अर्थ सांगताना पालकांची दमछाक होते.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव सर्वत्र फुटले आहे. जो तो आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातून शिकवित आहे. घरात मातृभाषा, शाळेत इंग्रजी आणि व्यवहारात हिंदी अशी भाषेची ‘खिचडी’ करत सध्याची पिढी आधुनिक शिक्षण घेत आहे. आजीने गोष्टीत घरी सांगितलेला काऊ म्हणजे कावळा, तर मॅम स्कूलमध्ये शिकविते, काऊ म्हणजे गाय, अशा भाषेच्या द्विधा अवस्थेत आजची पिढी व्यवहारीक भाषाज्ञान पुरते विसरत चालली आहे.
पहिली, दुसरीतीलच नव्हेतर नवव्या, दहाव्या वर्गातील मुलांनाही मराठी शब्दांचे अर्थ कळत नाही. अंकगणिताचे तर त्यांचे ज्ञान दिव्य असते. शब्दागणिक ते आपल्या पालकांना अर्थ विचारत असतात. बाजारात पालकांसोबत गेलेली मुलं हमखास प्रश्न करतात. दुकानदाराने अडीच रुपये सांगितले तर मुलगा सहज विचारतो अडीच रुपये म्हणजे किती? तेव्हा पालकांना इंग्रजीत सांगावे लागते ‘टू रुपीज आणि फिप्टी पैसा’. वन, टू, थ्री असे शिकलेल्या या मुलांना एकं, दोनंचा लवलेशही नसतो.
दहापर्यंत मराठीत आकडे पाठ असले तरी त्यानंतर मात्र या मुलांची बोंब पडते. शंभर रुपयाच्या वरील व्यवहार करताना मुलांची होणारी भंबेरी दिसून येते. हंड्रेड, टू हंड्रेड, फाईव्ह हंड्रेड असे शब्द सहजतेने उच्चारणारी मुले दीडशे, पावणेदोनशे, सव्वादोनशे अशा आकड्यांवर अडखळतात. दुकानदाराने सहज म्हणून पावणेदोनशे रुपये झाले, असे सांगितले तर या मुलांना पावणेदोनशे म्हणजे इंग्रजीत किती होतात, हे सांगावे लागते. साधे-साधे मराठी शब्दही त्यांच्या कोषात दिसत नाही. प्रत्येकदा त्यांना अर्थासह स्पष्टीकरण द्यावे लागते.
ग्रामीण भागात आजही अशी व्यवहारिक भाषेची अडचण येत नसली तरी शहरात कॉन्व्हेंट संस्कृतीने मराठी अंकगणिताचे पुरते वाटोळे केले आहे. धड इंग्रजीही बोलत नाही आणि पूर्ण मराठीही येत नाही अशा अवस्थेत आजची पिढी ज्ञानसंवर्धन करू पाहात आहे.
ग्रामीण परिमाणांचा लवलेशही नाही
सहज गप्पांच्या ओघात मुलाला एक वित अंतर ठेव, असे एका पालकाने सांगितले. त्यावर त्या मुलाने प्रश्नार्थक चेहरा करत वित म्हणजे काय? असा प्रतिप्रश्न केला. ग्रामीण आणि शहरी भागात ढोबळमानाने परिमाण मोजताना वित आणि हाताचे अंतर सांगितले जाते. शेर, अदली, पायली असे वजनाचे ग्रामीण परिमाण आहे. परंतु कॉन्व्हेंटच्या मुलांना वितच समजत नाही तेथे शेर आणि अदली काय समजणार? त्यांच्या लेखी शेर म्हणजे ‘टायगर’. वित म्हणजे अंगठ्यापासून करंगळीच्या टोकापर्यंत होणारे अंतर असते, असे जेव्हा त्या मुलाला सांगितले, तेव्हा इंचात ना फुटात नसणारे ही मुले खूप काही समजल्याचा भाव चेहऱ्यावर आणतात.