दिग्रसमध्ये सुसज्ज प्रशासकीय इमारत

By Admin | Updated: November 29, 2014 02:22 IST2014-11-29T02:22:14+5:302014-11-29T02:22:14+5:30

शहराच्या विविध भागात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

Well-equipped administrative building in Digras | दिग्रसमध्ये सुसज्ज प्रशासकीय इमारत

दिग्रसमध्ये सुसज्ज प्रशासकीय इमारत

सुनील हिरास दिग्रस
शहराच्या विविध भागात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एकाच कामासाठी सतत या कार्यालयातून त्या कार्यालय जावे लागत होते. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी दिग्रस येथे प्रशासकीय इमारत निर्माण करण्यात आली असून ४ कोटी ७७ लाख रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली असून फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आहे. तहसीलसह सहा कार्यालय येथे स्थलांतरित केले जाणार आहेत.
दिग्रस शहरात विविध शासकीय कार्यालये आहेत. मात्र या कार्यालयांच्या इमारती स्वतंत्र आहे. शहराच्या विविध भागात ही कार्यालये पसरली आहे. त्यामुळे या सर्व कार्यालयांना एका छत्राखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. तहसील परिसरात ही नवीन प्रशासकीय इमारत उभारली जात आहे. ८ मार्च २०१० रोजी या इमारत बांधकामाला परवानगी मिळाली. २४ महिन्याचा कालावधी बांधकामासाठी निश्चित करण्यात आला. परंतु कालावधीपेक्षा नऊ महिने अधिक लागले. जून २००० पर्यंत या इमारतीवर चार कोटी ७७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. सध्या प्रशासकीय इमारत बांधून तयार झाली आहे. फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे.
या इमारतीमध्ये तहसील, उपकोषागार कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक (मुद्रांक नोंदणी) कार्यालय, सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचा समावेश राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार केला असून तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी त्याची पाहणी केली. फर्निचरची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा व इतर कामे बाकी असून लवकरच ही इमारत हस्तांतरित होईल, असे त्यांनी सांगितले. सध्याचे तहसील कार्यालय एका जुन्या इमारतीमध्ये आहे. १९८१ मध्ये दिग्रस तालुक्याची निर्मिती झाली. त्यावेळी स्थानिक जिनिंगमध्ये कार्यालय होते. त्यानंतर १९८३ मध्ये स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. पंचायत समिती कार्यालयाजवळ ही इमारत आहे. अवघ्या ३० वर्षातच ही इमारत जीर्ण झाली. संगणकीकृत युगानुसार ही इमारत अपुरी पडत आहे. तर तालुका कृषी कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय गवळीपुरा भागात आहे. दुय्यम निबंधक कार्यालय घंटीबाबा मंदिराजवळ तर सहायक निबंधक कार्यालय शिवाजी चौकात भाड्याच्या इमारतीत आहे. ही प्रशासकीय इमारत झाल्यानंतर सर्वांचा त्रास कमी होऊन एका छत्राखाली सर्व कार्यालय येणार आहे.

Web Title: Well-equipped administrative building in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.