दिव्यांग स्वररागिनीच्या खांद्यावर कुटुंबाचा भार
By Admin | Updated: April 2, 2017 00:26 IST2017-04-02T00:26:20+5:302017-04-02T00:26:20+5:30
घरात अठराविश्व दारिद्र्य. यातच कुटुंबातील एक नव्हे दोन जन्मांध मुली. कुटुंबाचा गाडा ओढताना कायम दमछाक.

दिव्यांग स्वररागिनीच्या खांद्यावर कुटुंबाचा भार
सुनीताचे धाडस : नवतरुणांपुढे आदर्श
फुुलसावंगी : घरात अठराविश्व दारिद्र्य. यातच कुटुंबातील एक नव्हे दोन जन्मांध मुली. कुटुंबाचा गाडा ओढताना कायम दमछाक. अशा परिस्थितीत स्वररागिनी दिव्यांग सुनीताने कुटुंबाचा भार उचलला. आई-वडिलांसह एका अंध बहिणीची सेवा करू लागली. तिचा हा आदर्श नवतरुणांपुढे आहे.
बंदीभागातील चिखली वन येथील सुनीता ही दिव्यांग तरुणी. जन्मताच डोळे नसले तरी तिच्या कंठात मात्र कोकिळेचा वास. विविध स्पर्धा, विवाह समारंभ, भजनाच्या माध्यमातून ती कुटुंबासाठी पैसा गोळा करते. गणपत सूर्यवंशी असे तिच्या वडिलांचे नाव. बहीण वनमालाही दिव्यांग आहे. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आई-वडिलांच्या मागे आपले कसे होईल, ही विवंचना. परंतु सुनीताला असलेल्या संगीताच्या आवडीतून वनमालाचा प्रश्न सुटला. सुनीताने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन संगीत विशारद पदवी घेतली. वृद्धापकाळात आई-वडिलांचा आधार होऊन त्यांची सेवा करू लागली. आपल्या सुरेख कंठातून गाते तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होते.
(प्रतिनिधी)
मानधनासाठी धडपड
दिव्यांग वनमाला व सुनीताला शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. वडील गणपतराव सूर्यवंशी यांनी उमरखेड तहसील कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजविले. पंरतु त्यांना अद्याप मानधन सुरू झाले नाही. त्यामुळे या भगिनींना तत्काळ मानधन सुरू करावे, अशी मागणी होत आहे.