शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: November 20, 2014 23:00 IST2014-11-20T23:00:37+5:302014-11-20T23:00:37+5:30
येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच असून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर
उपकेंद्राचा भोंगळ कारभार : हातचे पीक नष्ट होण्याची भीती
घोन्सा : येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच असून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता विजेअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्नही करपण्याच्या मार्गावर आहे.
यावर्षी निसर्गाचा लहरीपणा आणि अपुरा पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पीक धोक्यात सापडले आहे. त्यातच येथील महावितरण उपकेंद्राअंतर्गत विजेचे १0 तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे पीक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. या उपकेंद्राअंतर्गत जवळपास ४० गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. याच उपकेंद्रातून कायर केंद्रालासुद्धा वीज पुरवठा करण्यात येतो. घोन्सा येथे पांढरकवडा येथून ३३ के.व्ही.चा वीज पुुरवठा करण्यात येतो. त्यातील जवळपास ११ के.व्हीचा पुरवठा हा कायर उपकेंद्रातील गावांना करण्यात येतो. उर्वरित २२ के.व्ही. वीज पुरवठ्यावर घोन्सा उपकेंद्रातील ४० गावांना वीज पुरवठा करण्यात येतो.
या उपकेंद्रातील गावांना विजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होतो. त्यातच अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील मोटारपंप सुरूच होत नाही. भारनियमन आणि कमी दाबाचा वीज पुरवठा, यामुळे परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांना शेतात पाणी असूनही ओलीत करणे दुरापास्त झाले आहे. अनेक शेतकरी तर रात्री ओलीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मधातच वीज गुल होत असल्याने ही बाबही दुरापास्त झाली आहे. या उपकेंद्राअंतर्गत येणारे अनेक विद्युत जनित्र बंद आहेत. अद्याप त्या ठिकाणी नवीन जनित्र बसविण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात मोटारपंप आहेत, परंतु ते विजेअभावी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)