जलस्रोतांनी तळ गाठल्याने दूषित पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 11, 2015 01:56 IST2015-05-11T01:56:32+5:302015-05-11T01:56:32+5:30
उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे.

जलस्रोतांनी तळ गाठल्याने दूषित पाणीपुरवठा
दिग्रस : उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे. मात्र नाईलाजाने ग्रामीण भागात तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते. आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे शासन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
शासन प्रत्येक वर्षी नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधीचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे असते परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायती गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याचे कामही केले जातात. मुख्यत: ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामे सांभाळतो. परंतु तेच गावात येत नसल्याने पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्यात हमखास अशुद्ध पाणी प्यावे लागते. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा कोरडा होणे, हिवताप, थंडी वाजणे असे विविध आजार बळावतात. सध्या उन्हाचा तडाखा सुरू आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होतो. मिळेल ते पाणी अशा परिस्थितीत प्राशन केले जाते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.
अनेक गावात नळ योजना असल्या तरी जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने सरळ विहिरीचे पाणी टाकीत आणि टाकीतून तेच पाणी नळाद्वारे प्रत्येकाच्या घरी जाते. या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे. या सर्वबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र ग्रामीण भागातील पाणी समस्या केवळ उन्हाळ्यातच तीव्र होते. नंतर पाऊस पडला की अधिकारीही लक्ष देत नाही.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची भीती दूषित पाण्यामुळे निर्माण होते. पाणी शुद्धीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)