४० तासांपासून पाणीपुरवठा खंडित
By Admin | Updated: November 16, 2014 22:54 IST2014-11-16T22:54:32+5:302014-11-16T22:54:32+5:30
मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी

४० तासांपासून पाणीपुरवठा खंडित
यवतमाळ : मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी ४८ तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थानिक तहसील चौकातील जलवाहिनी फोनलाईनचे खोदकाम करताना शनिवारी सकाळी फुटली. यामुळे मेन लाईन, पाटीपुरा, शास्त्रीनगर, गोदाम फैल, नेहरूनगर, गांधीनगर आणि धामणगाव मार्गावरील भागाला पाणीपुरवठा झाला नाही. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या दिवशी पाणीपुरवठा झाला नसलेल्या भागाला पुन्हा दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल एवढे साठविलेले पाणी संपल्याने त्यांना हातपंपाचा आधार घ्यावा लागला. नळाची सोय असलेल्या भागातील हातपंप आणि विहिरी सुस्थितीत ठेवण्याकडे नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होते. परिणामी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागते. याचीच प्रचिती दोन दिवसांपासून नळ नसल्याने घरापासून दूर असलेल्या हातपंपावर धाव घ्यावी लागणाऱ्या लोकांना आली. शहरातील लोकांना पाण्यासाठी त्रास होत असताना प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले. नळ केव्हा सोडले जाईल याची माहिती देण्यासाठीही कुणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांविरुध्द आपला रोष व्यक्त केला. (वार्ताहर)