Water scarcity in remote villages of the district | जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ

ठळक मुद्दे१४ टँकर सुरू : ३६ खासगी विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या गावांसाठी १४ टँकर सुरू करण्यात आले असून, ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.
जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुर्गम भागातील खेड्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. 
सध्या पुसद, आर्णी, यवतमाळ आणि कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात पुसद तालुक्यातील खंडाळा-अमृतनगर, लोहारा (खुर्द), बुटी (इजारा), लोहारा (इजारा), सावरगाव (बंगला), मारवाडी (खु.), कारला, म्हैसमाळ, वडसद, जवळा, आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर आणि पाळोदी तर यवतमाळ तालुक्यातील इचोरी व कळंब तालुक्यातील किनवट येथे १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी काही गावांमध्ये टँकरच्या प्रत्येकी दोन तर काही गावांमध्ये प्रत्येकी एक फेरी मारली जात आहे. तब्बल १९ हजार ३६२ नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. 
 

४७ हजार नागरिकांची तहान विहिरीवर 
 प्रशासनाने ४० गावांतील ४७ हजार ५६२ नागरिकांसाठी ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय चार ठिकाणी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आर्णी तालुक्यात १४, दिग्रसमध्ये सात, उमरखेडमध्ये चार, वणी येथे पाच, पुसदमध्ये दोन, यवतमाळमध्ये एक, बाभूळगावमध्ये दोन तर कळंब तालुक्यातील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महागाव, घाटंजी, दारव्हा, केळापूर आणि झरी जामणी या पाच तालुक्यांत एकाही खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. 

मे महिन्यात दाहक स्थिती  
 एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील अनेक गावे तहानली आहेत. टँकर आणि खासगी विहिरी अधिग्रहण करून तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. ही स्थिती मे महिन्यात आणखी दाहक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये कमी पाऊस होऊनही जिल्ह्यात टँकरची संख्या कमी होती. गेल्या वेळी समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात १४ टँकर सुरू करावे लागले. त्यामुळे मे महिन्यात स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Water scarcity in remote villages of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.