आर्णी तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर
By Admin | Updated: November 27, 2014 23:41 IST2014-11-27T23:41:59+5:302014-11-27T23:41:59+5:30
तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर

आर्णी तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर
आर्णी : तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर समस्येची अद्याप तरी दखल घेतल्याचे दिसत नाही.
पंचायत समिती व तहसील कार्यालयात दरवर्षी ह्या समस्यां संदर्भात आढावा बैठक घेतल्या जाते मात्र ही आढावा बैठक जेव्हा पाणी टंचाईचे खरे चटके सुरु होतात तेव्हा सबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी वेळेवर धडपड करतात व तात्पुरती मलमपट्टी करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्या जात नाही. आजही अनेक गावात योजना कागदावर असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो. तरोडा, अंजनखेड, जवळा, चांदणी, उमरी(पठार), शेलू.शे., सुभाषनगर, पाळोदी, चिमटा, इचोरा, सुधाकर नगर, दातोडी, बोरगाव (पुंजी), भानसरा, सुकळी, देऊरवाडी, गवना, कुऱ्हा, यरमल हेटी, भंडारी, रानिधानोरा, पांगरी, जांब, माळेगाव आदी गावांचा पाणी टंचाईशी निकटचा सबंध आहे. काही गावांचे प्रस्ताव कागदावर तर काही कामे मंजूर होऊन ते भ्रष्टाचाराने अपूर्ण स्थितीत आहे. तरोडा येथे लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र ह्या गावात आजही पाणीसमस्या समस्या कायम आहे.
तीन महिन्याअगोदर विहिरीचे काम सुरु असताना निकृष्ट कामामुळे मजुरासह स्लॅब कोसळल्याने पाच मजूर गंभीर जखमी झाले होत. तालुक्यात ऐकून १ लाख ४० हजार लोकसंख्या असून कागदोपत्री ६९ नळयोजना ४७८ हात पंप ३४० सार्वजनिक विहिरी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दाखविल्या आहेत. भारत निर्माण योजना व राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत सुमारे ३५ कामे प्रस्तावित असताना काही कामे भ्रष्टाचाराने तर काही कामे उदासीन धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही अपूर्णच आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न याही वर्षी मार्च महिन्यापासून आर्णी तालुक्यात बिकट बनणार आहे. त्यामुळे या विभागातील केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार राजू तोडसाम व आमदार ख्वाजा बेग यांनी संबधित यंत्रणेला धारेवर धरून नागरिकांच्या या जिवनावश्यक प्रश्नाचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)