दुष्काळासाठी जलसंधारण मोट
By Admin | Updated: December 23, 2014 23:13 IST2014-12-23T23:13:17+5:302014-12-23T23:13:17+5:30
यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ

दुष्काळासाठी जलसंधारण मोट
यवतमाळ : यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाच्या विविध यंत्रणेकडून अनेक वर्षांपासून डझनावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र परस्परपूरक असलेल्या या योजना समन्वयाने राबवित नसल्याने त्याचा फायदा होत नाही. आता दुष्काळी स्थितीत त्याचा सकारात्मक परिणाम घेण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ या माध्यमातून सर्वच योजनांची मोट बांधण्यात आली आहे. प्रत्येकाने समन्वायाने काम करावे, असे आदेश नागपूर येथील चीटणीस सेंटरवर झालेल्या बैठकीत देण्यात आले.
दृष्काळाचा भस्मासूर आग ओकत असतानाच पाणीटंचाईची झळ ही सर्वांना होरपळून टाकाणारी आहे. यावर उपाय म्हणून सर्व शक्तीनिशी जलसंधारण करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून विविध यंत्रणेकडून जलसंधारणाच्या उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु या योजना राबविताना विशेष रस स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाने दाखविला नाही. आता आणीबाणीच्या स्थितीत मरगळ झटकून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान’ हा उतारा शोधून काढला आहे.
जिल्हा परिषदेतील सिंचन विभाग, रोजगार हमी योजना, पंचायत विभागाची आदर्श ग्राम योजना, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय राबवित असलेली गतीमान पाणलोट योजना, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना, महात्मा जोतीबा फुले जल भूमी सुधार अभियान, पाणलोट विकास कार्यक्रम अशा अनेक योजना कित्येक वर्षापासून स्वतंत्ररित्या राबविण्यात येत आहे. त्यामुुळे त्याचा कोणताच परिणाम दिसत नाही, केवळ पैसा खर्च होतो. हे टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवायचे आहे. याचे नेतृत्व जिल्हाधिकारी करणार आहे. त्यांच्या अधिनस्थ कृषी विकास अधिकारी, सिंचन अभियंता, कृषी अधीक्षक विकास अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहे. ठराविक गावांची निवड करून तेथील काम पूर्ण करावे, अशाच पध्दतीने व टप्प्याटप्प्याने हे अभियान राबविले जाईल. वर्षभरात अमरावती विभागामध्ये किमान पाच हजार गावाचे उद्दिष्ट पूर्ण केले जावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
या बैठकीला जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह जलसंधारण, ग्रामविकास, कृषी या सर्व विभागांचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, रोहयो आयुक्त आणि विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष उपस्थित होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही बैठक झाली. यापूर्वी सोमवारी खुद्द मख्यमंत्र्यांनी नागपूर विभागाची बैठक घेऊन सूचना दिल्या. मंगळवारच्या बैठकीला त्यांना उपस्थित राहता आले नाही. ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही बैठक घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)