पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:37 IST2019-05-12T21:35:34+5:302019-05-12T21:37:22+5:30
पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत.

पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाकडे टँकर उपलब्ध होणे शक्य नसल्याने खासगी ठेकेदारांमार्फत हे टँकर चालविले जातात. मात्र ‘लोकमत’चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या टँकर मालक-चालकांची मनमानी उघड झाली. टँकरवाले सर्रास नियम मोडून पुढे जात आहेत. गावकऱ्यांना ही बाब माहीत आहे. तरीही ड्रमभर नको पण निदान बकेटभर तरी पाणी मिळते, या आशेपायी ते टँकर चालकांच्या नियमबाह्य वर्तनाबाबत गप्प आहेत. अडला नारायण धरी गाढवाचे पाय, अशी गावकऱ्यांची अवस्था आहे. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही प्रचंड गाफिल आहे. टँकरची फेरी कुठे सुरू आहे, कोठून पाणी भरले, कोणत्या गावात वाटप केले, हे कळण्यासाठी वाहनावर जीपीएस यंत्र बसविणे बंधनकारक आहे. मात्र ‘लोकमत’च्या पाहणीत अनेक टँकरवर जीपीएस यंत्र आढळले नाही. काही टँकरवर हे यंत्र असले तरी ते कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रशासनच जाणीवपूर्वक टँकरकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यात टँकर चालक आणि प्रशासनातील कर्मचाºयांचेही साटेलोटे असण्याची शक्यता आहे. टँकर शासकीय आहे की खासगी हे कळण्यासाठी टँकरवर बॅनर लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात कोणत्याही टँकरवर बॅनरचा पत्ता नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गावात पाणी वाटपाची जबाबदारी टँकर चालकाला दिली गेली आहे, त्या गावातील नामनिर्देशित महिलांची स्वाक्षरी दररोज लॉगबुकवर घेणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश गावांमधील टँकर चालकांकडे असलेले लॉगबुक कोरे करकरीत आढळले. गावातील महिलांना विचारले असता कधीच आमच्या सह्या घेतल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व परिस्थितीवरुन शासकीय टँकरच्या नावाखाली काही गावांमध्ये पाण्याचा धंदा सुरू असण्याची भीती आहे. गावकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे.
या गावांची तहान टँकरवरच
यवतमाळ - पांढरी, इचोरी, किटा, आर्णी - सुधाकरनगर, नेर - खरडगाव, आजंती, घुई, बाभूळगाव - फत्तेपूर, सारफळी, दारव्हा - भांडेगाव, करजगाव, पुसद - बाळवाडी, पन्हाळा, मारवाडी, लोहरा खुर्द., म्हैसमाळ, वडसद, बुटी ई., सावरगाव बंगला, लोहरा ई., महागाव - फुलसावंगी, घाटंजी - चांदापूर, निंबर्डा.