सांडपाण्याने नरकयातना
By Admin | Updated: December 30, 2014 23:46 IST2014-12-30T23:46:20+5:302014-12-30T23:46:20+5:30
बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे.

सांडपाण्याने नरकयातना
यवतमाळ : बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. बिल्डरांची हेकेखोरी त्यांच्या जीवावर उठली आहे. दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुचना केल्यानंतरही उपाय केले जात नाही.
लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५ सह दारव्हा मार्गावर असलेल्या सदनिकांमधील पाणी रेल्वे रूळाकडे सोडून देण्यात आले आहे. लोकांच्या अगदी अंगणापर्यंत पोहोचलेले पाणी थांबविण्यासाठी सध्या तरी कुठलाही मार्ग दिसत नाही. १५ ते २० फुटाचा पसारा सांडपाण्याचा असल्याने नाल्याचे स्वरूप रेल्वे रूळ परिसराला आले आहे. या भागाला लागूनच नागरी वस्ती आहे. काही ठिकाणी तर खुल्या प्लॉटपर्यंत सोडपाणी येवून पोहोचले आहे.
वॉर्ड क्र.५ मध्ये असलेल्या एका सदनिकेचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली होती. काही दिवसानंतरच बुजलेली ही पाईपलाईन या सदनिकेमधील १५० लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर प्रश्न झाली होती. त्यामुळे आता या सदनिकेचे पाणी दारव्हा मार्गावर निघणाऱ्या रेल्वे रूळाजवळ सोडून देण्यात आले आहे. त्यात जनावरे आणि डुकरांचा मुक्त संचार असतो. या भागातून जाताना नाक दाबूनच मार्ग काढावा लागतो.
या सदनिकेच्या घाण पाण्यामुळे होणारा त्रास कमी होतो म्हणून की काय अमरावती मार्गाला लागून असलेल्या दोन ते तीन सदनिकांच्या सांडपाण्याचीही भर यात पडली आहे. काही दिवसानंतर या गटाराचे पाणी नागरिकांच्या अंगणात पोहोचल्यास नवल वाटू नये. ग्रामपंचायतीने यावर उपाय म्हणून संबंधित बिल्डरांना वारंवार सूचित केले. परंतु त्यांनी हात झटकले. आता पुन्हा काही नवीन सदनिका निर्माण होत आहे. त्यांच्याजवळही सांडपाणी वाहून जाण्यासाठीचा कुठलाही प्लान दिसत नाही. संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. परिणामी नागरिकिांनी स्वतंत्र व्यवस्था (शोषखड्डे) तयार केले. परंतु हा उपाय कायमस्वरूपी साथ देणारा नाही. वारंवार खड्डे उपसावे लागत असल्याने खर्चाचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत नाल्यांचे बांधकाम हाच एक मुख्य उपाय आहे.
सदनिका बांधताना सांडपाण्याची काय व्यवस्था आहे याची खातरजमा केल्याशिवाय ग्रामपंचायतीने परवानगी देवू नये, असे नागरिकांचे मत आहे. परंतु कुठलाही ग्रामपंचायत या सूचनेला महत्त्व देताना दिसत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांनाच भोगावा लागतो. या समस्येत अधिक भर पडत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अलीकडे डासांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. डेंग्यूसारखे आजार फैलावत आहे. त्यामुळे हा विषय प्रशासन गांभीर्याने घेतील, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)