पूस नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:26+5:30
शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पूस धरणात तूर्तास ९८ टक्के पाणीसाठा आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा जुलै महिन्यातच पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

पूस नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पुसदकरांची तहान भागविणारे पूस धरण ९८ टक्के भरले आहे. धरण कोणत्याही क्षणी पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पूस धरणात तूर्तास ९८ टक्के पाणीसाठा आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा जुलै महिन्यातच पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
पूस धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पूस नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील चिखली (कॅम्प), वनवार्ला, बान्शी, येरंडा, सावंगी, रंभा, पिंपळगाव (शेलू), कोप्रा (भोजला) आदी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. ही नदी शहरातून वाहत असल्याने नदीकाठावरील शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पूस धरण कधीही ओव्हर फ्लो झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठावरील नागरिकांनी आपली निवासस्थाने काढून घ्यावीत, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, नदीलगतची घरे सूचना मिळताच खाली करावीत, अन्यथा कोणतीही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पूस धरणात पाणीसाठा वाढल्याने नदीकाठावरील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुसदवासीयांमध्येही धरण भरल्याने समाधान आहे. तालुक्यात आजपर्यंत ३९४.५ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे.