पीक वाचविण्यासाठी रात्र काढावी लागते जागून

By Admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:32+5:302014-10-25T22:49:32+5:30

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती वाचवावी कशी या समस्येत शेतकरी आहे.

Wake up the night to save the crop | पीक वाचविण्यासाठी रात्र काढावी लागते जागून

पीक वाचविण्यासाठी रात्र काढावी लागते जागून

भारनियमनाचा बडगा : वन्यप्राण्यांचाही पिकात धुडगूस
यवतमाळ : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती वाचवावी कशी या समस्येत शेतकरी आहे. या पिकांना देण्यासाठी ज्यांच्या कडे पाण्याची व्यवस्था आहे ते सुद्धा भारनियमनामुळे पाणी देऊ शकता नाही. रात्रभर जागून कसेतरी पाणी द्यावे लागत आहे.
यावर्षी आधीच निसर्गाने त्रस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन व कापसासारखे नगदी पिके गेली आहेत. सुरूवातीला पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कोसळले. त्यानंतर पावसाळा संपताना काही प्रमाणात दमदार पाऊस झाला आणि पिकांना उभारी मिळाली. परंतु पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. आता तो परतण्याची शक्यताही मावळली.
त्यातच आॅक्टोबर हिटमुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे विविध किडींचा पिकांवर प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे हातातील पिकेही जाण्याची भिती निर्माण झाली. यातच पिकांना पाण्याची गरज असताना भारनियमनामुळे ते
देता येत नसल्याचे शेतकरी सांगत आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी असूनसुद्धा भारनियमन असल्यामुळे ते पाणी पिकांपर्यंत पोहचविणे शक्य होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातच रात्र जागून काढावी लागते.
जेव्हा वीज येते तेव्हा ते पाणी द्यायला लागतात. परंतु १५ ते २० मिनिटातच पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत होतो. अशा स्थितीत सतत शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही. मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:च शेतात जागलीला जावे लागते. ज्यांच्याकडे घरात एकापेक्षा अधिक माणसे आहेत अशांना पिके वाचविणे शक्य होत आहे. परंतु ज्या घरात एकटाच माणूस आहे अशा शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देण्याच्या प्रतिक्षेत शेतात थांबून राहणे कठीण होत आहे.
त्यातच अनेकांची शेती जंगलाला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या हैदोसालाही तोंड द्यावे लागते. अनेक संकटातून वाचलेले कसेबसे पीक वन्यप्राणी आता नष्ट करीत आहेत. रानडुक्कर, रोही असे वन्यप्राणी शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहे. याबाबत वारंवार वनविभागाकडे तक्रारी करूनही त्यांची दखल घेतलीच जात नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक नैसर्गिक संकट सुरूच आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती डबघाईस आली आहे. डोक्यावरील कर्ज तसेच आहे. त्यामुळे बँका पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. अनेकांच्या घरची विवाह खोळंबली आहे. अशावेळी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Wake up the night to save the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.