२८०० कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST2020-11-11T05:00:00+5:302020-11-11T05:00:05+5:30
त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा पगार महामंडळाकडे थकीत आहे. हाती आलेल्या पगारातून दिवाळी भागणार आहे. मात्र मागील काळात पडलेला मोठा खड्डा बुजविण्यासाठी थकीत पगार मिळण्याची गरज आहे.

२८०० कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील नऊ महिन्यांपासून वेतनात अनियमितता असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी गोंधळून गेले आहेत. पैसा वेळेवर हाती येत नसल्याने आर्थिक व्यवहारात अडचणी येत आहे. गेली तीन महिन्यांपासून तर त्यांचा प्रचंड आर्थिक कोंडमारा झाला आहे. यवतमाळ विभागातील दोन हजार ८०० कर्मचारी कठीण परिस्थितीतून दिवस काढत आहेत. दिवाळीतही पगार मिळतो की नाही याविषयी शंकाच होती. अखेर महामंडळाने या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिला. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा पगार महामंडळाकडे थकीत आहे. हाती आलेल्या पगारातून दिवाळी भागणार आहे. मात्र मागील काळात पडलेला मोठा खड्डा बुजविण्यासाठी थकीत पगार मिळण्याची गरज आहे.
चरितार्थ थांबला
तीन महिन्यांपासून पगार नव्हता. त्यामुळे किराणा दुकानाची उधारी थांबली. घरभाडे, मुलांच्या शाळेची फी हे व्यवहार रखडले आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या औषध पाण्याचा खर्च भागविताना नाकीनऊ आले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी बराच वेळ लागेल.
सामूहिक प्रयत्नातून संकट दूर होईल
एसटीवर यापूर्वीही अनेकदा आर्थिक संकटं आली. यातून मार्ग निघाले. महामंडळ आजही तोट्यात आहे. मिळालेल्या एक महिन्याच्या पगारातून थोडाफार आधार झाला. पुढील काळातील वेतन नियमित होणे आवश्यक आहे. एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे.
-प्रवीण मिश्रा, एसटी कर्मचारी
दिवाळीसाठी २८ बसेस
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातर्फे दिवाळीसाठी जादा २८ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे, मुंबई यासह इतर ठिकाणासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: महामंडळाचा पुणेवर जादा भर आहे.
वेतनासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सोमवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या पगारातून उधारी चुकवावी लागणार आहे. पुढे जैसे थे परिस्थिती होईल.
- राहुल धार्मिक, यवतमाळ विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना