रक्तसाठवण केंद्राची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 11, 2015 01:52 IST2015-05-11T01:52:38+5:302015-05-11T01:52:38+5:30
वणी परिसरात औद्योगीकरणाचा सपाटा वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणाने कहर केला आहे.

रक्तसाठवण केंद्राची प्रतीक्षा
वणी : वणी परिसरात औद्योगीकरणाचा सपाटा वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणाने कहर केला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना विविध आजारांनी बेजार केले. तसेच वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आजारी रूग्णांना व अपघातग्रस्तांना अनेकदा रक्ताची गरज भासते. मात्र येथे रक्त साठवण केंद्र नसल्याने रूग्णांना रक्तासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.
वणी परिसरात कोळशावर आधारीत विविध उद्योग व कोळसा खाणी, यामुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषणाने विळखा घातला आहे. अनेक रूग्णांना दीर्घ आजार होत आहे. तसेच सिकलसेल, क्षयरोग, दमा, मधुमेह, रक्तदाब या रोगांची अनेकांना लागण झाली आहे. कित्येक वेळा या रोगाचे रूग्ण तातडीने दवाखान्यात दाखल करावे लागतात. रूग्णांना रक्त पुरवठा व हिमोग्लोबीनचे प्रमाणे कमी झाल्याने बाहेरून रक्त पुरवठा करण्याची वेळ येते. परंतु येथे रक्त साठवण केंद्र नसल्याने रूग्णाला रक्त पुरवठा करता येत नाही. तसेच अपघातामध्ये क्षतीग्रस्त झालेल्या रूग्णांनाही रक्त पुरवठ्याची गरज असते. इतर सुविधा असतानाही केवळ रक्त पुरवठा करण्यासाठी रूग्णांना येथून रेफर करावे लागते.
वणी परिसरात आत्तापर्यंत अनेक रक्तदान शिबिरे झाली आहे. बहुसंख्य तरूणांनी यामध्ये रक्तदान केले आहे. परंतु हे रक्त येथे साठवून ठेवण्याची सोय नसल्याने नागपूर व चंद्रपूर येथील रक्तपेढ्यांना दान करावे लागते. वणीतील तरूणांचे रक्त येथीलच रूग्णांना कामी पडत नसल्याने या रक्तदान शिबिराचा उपयोग तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी व तेथे रक्त साठवण केंद्र निर्माण करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्षच केले जात आहे.
ग्रामीण रूग्णालयात सिकलसेल आजारासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. तालुक्यातील राजूर, शिरपूर, कायर, कोलगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राथमिक तपासणी केलेले सिकलसेलचे रूग्णही वणी ग्रामीण रूग्णालयात पाठविले जातात. या आजारामध्ये रक्तातील पेशी विळ्याच्या आकाराच्या होतात. त्यामुळे शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया बंद होते. म्हणूनच सिकलसेल रूग्णांना सतत रक्त देण्याची गरज भासते. तथापि येथील ग्रामीण रूग्णालयात रक्त साठवण केंद्र नसल्याने सिकलसेल रूग्णांचे प्राण धोक्यात आले आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात रक्त साठवण केंद्राचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्याला अजुनही मंजुरी न मिळाल्याने यंत्रसामग्री मिळाली नाही.
सिकलसेल रूग्णांचे त्वरित निदान व्हावे, म्हणून जिल्ह्यात नऊ ठिकाणी इलेक्ट्रोफोरोसीस यंत्र देण्यात आले आहे. त्याद्वारे रूग्णांची तपासणी होऊन काही वाहक रूग्ण, काही निगेटीव्ह रूग्ण व काही पीडित रूग्ण अशी वर्गवारी करून त्यांना पिवळे, पांढरे व लाल कार्ड देण्यात येतात. मात्र तालुका स्तरावर या रूग्णांना रक्त मिळेनासे झाले आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी सहाय्यकाची पदे रिक्त आहे. त्यामुळे रक्त साठवण केंद्र मिळण्यास अडचणी येत असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)