शासकीय कृषी महाविद्यालयात प्रवेशाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:16 IST2017-09-01T22:15:52+5:302017-09-01T22:16:09+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत (पीकेव्ही) यवतमाळला शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाले असले तरी तेथे प्रवेशाची अद्याप प्रतीक्षाच आहे.

शासकीय कृषी महाविद्यालयात प्रवेशाची प्रतीक्षाच
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत (पीकेव्ही) यवतमाळला शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाले असले तरी तेथे प्रवेशाची अद्याप प्रतीक्षाच आहे. खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे प्रवेश तातडीने सुरू व्हावे म्हणून प्रयत्नरत आहेत. तर दुसरीकडे शासकीय प्रवेशाला होणारा विलंब खासगी कृषी महाविद्यालयांकडून कॅश केला जात आहे. त्याच्या प्रवेशाचे दर ‘खासगी’त सात ते नऊ लाखांपर्यंत गेल्याची माहिती आहे.
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, दारव्हा, कळंब व पांढरकवडा तालुक्यात चार खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेणे शेतकरी-शेतमजुरांच्या आवाक्याबाहेरील आहे. तेथील प्रवेशाचे लाखोंचे आकडे या गरीब शेतकºयांना गाठणे शक्य नाही. म्हणूनच या खासगी महाविद्यालयांवर मात करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी यवतमाळला शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील गरिबांच्या मुलांना कृषी शिक्षणासाठी येथे प्रवेश मिळावा, हा प्रामाणिक उद्देश या मागे होता. वाघापूर रोडवरील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आवारात हे नवे कृषी महाविद्यालय थाटण्यात आले आहे. गाजावाजा करून या महाविद्यालयाचे उद्घाटन झाल्याने यंदाच्या सत्रापासूनच तेथे ‘बीएस्सी’च्या (अॅग्रीकल्चर) ६० जागांचे प्रवेश सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही हे प्रवेश सुरू झालेले नाहीत. या प्रवेशाची मुदत संपली असली तरी विशेष राऊंड घेण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यामुळे अद्यापही कृषी शिक्षण घेऊ इच्छिणाºया गोरगरीब शेतकरी-शेतमजुरांच्या मुलांच्या आशा कायम आहेत.
शासकीय प्रवेश लांबल्याची आयतीच संधी खासगी महाविद्यालयांना मिळाली. त्यामुळे काही खासगी कृषी महाविद्यालयांमधील प्रवेशाचे दर नऊ लाखांपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. यावर्षी शासकीयची प्रवेश प्रक्रिया सुरूच होऊ नये, अशी या खासगी महाविद्यालयांची सुप्त इच्छा आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणी पुढे केल्या जात असल्याची चर्चा आहे. जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची इमारत, शिक्षक वर्ग उपलब्ध असताना शासकीय प्रवेशाला विलंब केला जात असल्याने प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये रोष पहायला मिळतो आहे.
‘प्रवेश शासकीय, शिक्षण खासगी’तचा पर्याय
इमारत व पायाभूत सुविधांची अडचण सांगून शासकीय कृषी महाविद्यालयातील प्रवेश लांबणीवर टाकले जात असले तरी या प्रवेशासाठी पर्याय उपलब्ध असल्याची बाब कृषी क्षेत्रातूनच पुढे आली आहे. शासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे प्रत्यक्ष शिक्षण खासगी महाविद्यालयात पूर्ण केले जाऊ शकते. हा पॅटर्न जामखेड येथे सुरु आहे. प्रवेश जामखेडात आणि प्रत्यक्ष शिक्षण राहुरीमध्ये घेतले जात आहे. तेथे आजी-माजी मंत्र्यांमध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला होता. त्यावर पर्याय म्हणून खासगी कृषी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले जात आहे.
विदर्भातील शेतकºयांच्या मुलांसाठी सोय व्हावी म्हणून खास बजेटमधून शासकीय कृषी महाविद्यालयाला मान्यता मिळविण्यात आली. तेथील प्रवेश तातडीने सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यात इमारत, पायाभूत सुविधा या सारख्या अडचणी येत आहेत. घाई केल्यास जामखेडप्रमाणे कोर्ट-कचेरी होण्याची व विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सावध पावले उचलून प्रवेश सुरू करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.
- मदन येरावार
पालकमंत्री, यवतमाळ