आज मतदान

By Admin | Updated: October 14, 2014 23:23 IST2014-10-14T23:23:49+5:302014-10-14T23:23:49+5:30

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात बुधवार १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील २० लाख २५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी

Voting today | आज मतदान

आज मतदान

विधानसभा निवडणूक : सात मतदारसंघात १०३ उमेदवार
यवतमाळ - लोकमत वृत्तसेवा
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात बुधवार १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील २० लाख २५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मंगळवारी पोलिंग पार्ट्या जिल्ह्यातील २ हजार ३३६ मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी १० हजार ७०२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून केंद्रीय आणि राज्य राखीव दलासह तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पुसद आणि उमरखेड या मतदारसंघात बुधवारी १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या सात मतदारसंघात १०३ उमेदवार रिंगणात असून त्यात वणी १३, राळेगाव १०, यवतमाळ २२, दिग्रस १३, आर्णी ११, पुसद १५ आणि उमरखेड मतदारसंघात १९ उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन हजार ३३६ मतदान केंद्र असून वणी ३०९, राळेगाव ३४१, यवतमाळ ३८७, दिग्रस ३४८, आर्णी ३४३, पुसद २९६, उमरखेड ३१२ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
सर्व सातही विधानसभा मतदारसंघात २० लाख २५ हजार ९१८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात वणी मतदारसंघात दोन लाख ६८ हजार ६३९, राळेगाव दोन लाख ६९ हजार ५५५, यवतमाळ तीन लाख ४३ हजार ३९०, दिग्रस दोन लाख ९५ हजार ८१३, आर्णी दोन लाख ८७ हजार २९२, पुसद दोन लाख ८१ हजार ५७३ तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ५८६ मतदार आपला हक्क बजावतील.
जिल्ह्यातील २ हजार ३३६ केंद्रावर मतदान होणार असून त्यातील ९८ केंद्र संवेदनशील आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र निरीक्षक देण्यात आला आहे. एसटी बसेस आणि इतर वाहनाने पोलिंग पार्टी मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आली.
पांढरकवडा तालुक्यातील मतदान केंद्रावर घेऊन जाणाऱ्या एक बस नादुरुस्त झाली तर दुसरी रस्त्याच्या खाली उतरली होती. त्यामुळे तेथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.