यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:46 IST2018-07-25T13:45:07+5:302018-07-25T13:46:49+5:30
मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे.
येथे आज बुधवारी सकाळी बाजारपेठेत जमलेल्या मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्र् यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकांनी केलेल्या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनाही त्याचे लक्ष्य बनवण्यात आले. मात्र त्यांनी हेल्मेट घातले असल्याने पुढील अनर्थ टळला.
तालुक्यातील विडूळ येथे सकाळी ११ च्या सुमारास लोखंडी रॉड व काठ्यांनी आंदोलकांनी बसची तोडफोड केली. यात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. काही खाजगी वाहनांचीही तोडफोड संतप्त आंदोलकांनी केली.
उमरखेडमध्ये माहेश्वरी चौकात आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या दगडफेकीत दराटीचे ठाणेदार सुभाष उन्हाळे यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला तर दोन नागरिकही जखमी झाले. मोर्चेकऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुसदवरून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली. शिवसेनेचे नेते व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनाही आंदोलकांनी धक्काबुक्की केली.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहिली. तसेच वकिलांच्या संघटनेने तहसीलदारांना आपले निवेदन दिले.
या आंदोलनादरम्यानच येथील पोलीस ठाण्यातील शिपाई विलास शेळके यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तात्काळ नांदेड येथे हलवण्यात आले. या संपूर्ण परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.