भावाच्या मारेकऱ्याला अखेर गावकऱ्यांनीच शोधलं; तीन दिवसांपासून होता झाडावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 16:42 IST2019-09-08T16:40:49+5:302019-09-08T16:42:49+5:30
आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश

भावाच्या मारेकऱ्याला अखेर गावकऱ्यांनीच शोधलं; तीन दिवसांपासून होता झाडावर
महागाव (यवतमाळ): लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना चिल्ली इजारा गावात ५ सप्टेंबरला घडली होती. मात्र तीन दिवस उलटूनही आरोपीला पकडण्यात महागाव पोलिसांना अपयश आलं. मात्र स्वत: गावकऱ्यांनी सतत शोध मोहीम राबवून अखेर आरोपी भावाला पकडून रविवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
अर्जून पांडुरंग राठोड (१८) असं आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जुननं त्याचा मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपनं वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावांची आईदेखील जखमी झाली होती. यानंतर अर्जुन राठोड पसार झाला होता. तीन दिवस उलटून गेल्यावरही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात महागाव पोलिसांना यश आलं नाही.
चिल्ली इजारा गावकऱ्यांनी स्वत:च परिसरातील शेतशिवारात अर्जुनचा शोध सुरू केला. अखेर रविवारी सकाळी १० वाजता गावकऱ्यांना चिल्ली शिवारात दडून बसलेला अर्जुन सापडला. गावकऱ्यांनी त्याला पकडून महागाव पोलिसांच्या ताब्यात दिलं. अर्जुन चिल्ली शिवारातील कुंभीच्या झाडावर बसून असल्याची माहिती मिळताच गावकरी व तरुणांनी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस पाटील राजू राठोड यांनी दिली. चिल्ली गावातील तरूण, पोलीस पाटलासह अनेक नागरिकांनी यात महत्वाची भूमिका बजावली.