आसोला गावाला साडेचार वर्षांपासून सरपंचच नाही
By Admin | Updated: December 22, 2014 22:56 IST2014-12-22T22:56:06+5:302014-12-22T22:56:06+5:30
सहा महिने, वर्ष नव्हेतर तब्बल साडेचार वर्षांपासून सरपंचाशिवाय गावाचा कारभार सुरू आहे. लालफितशाहीच्या कामाचा असाही नमुना असलेले गाव म्हणजे आसोला होय. राखीव उमेदवार नसल्याने सरपंचाची निवडच झाली नाही.

आसोला गावाला साडेचार वर्षांपासून सरपंचच नाही
नेर : सहा महिने, वर्ष नव्हेतर तब्बल साडेचार वर्षांपासून सरपंचाशिवाय गावाचा कारभार सुरू आहे. लालफितशाहीच्या कामाचा असाही नमुना असलेले गाव म्हणजे आसोला होय. राखीव उमेदवार नसल्याने सरपंचाची निवडच झाली नाही. लोकांना मात्र आपली कामे करून घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे तर दुसरीकडे गावाच्या विकासाचे तीनतेरा वाजले आहे.
यवतमाळ तालुक्यात मात्र नेरपासून जवळ असलेल्या या गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक २०१० मध्ये झाली. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले. परंतु आरक्षित पदासाठीचा उमेदवार नव्हता. माणिक राठोड, सुभद्रा जयस्वाल, प्रवीण जयस्वाल, दत्ता आडे, विनोद जाधव, उषा राठोड, सुमित्रा राठोड हे सदस्य म्हणून निवडून आले. यातील एकही सदस्य राखीव पदासाठी निवडून आलेला नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
या पदासाठी उमेदवार असतानाही प्रशासनाने निवड प्रक्रिया घेतली नाही. गेली साडेचार वर्षांपासून या गावाचा कारभार सरपंचाशिवाय सुरू आहे. विकास कामांना खीळ बसला आहे.
शिवाय नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे. सरपंच निवडीच्या कार्यक्रमासाठी तहसीलने जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे क्रमप्राप्त होते.
मात्र गेली साडेचार वर्षात तहसीलने ही बाब ध्यानातच घेतली नाही. यावरून येथील तहसील कार्यालयाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. (तालुका प्रतिनिधी)