पशुवैद्यकीय दवाखाने ‘पांढरा हत्ती’
By Admin | Updated: October 6, 2016 00:21 IST2016-10-06T00:21:26+5:302016-10-06T00:21:26+5:30
शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत.

पशुवैद्यकीय दवाखाने ‘पांढरा हत्ती’
गोपालक त्रस्त : ११२ गावांत एक लाखावर जनावरे, उपचार केवळ नावालाच
महागाव : शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत. तालुक्यातील अनेक पशुचिकित्सालयांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. त्यामुळे उपचारसाठी जनावरे घेऊन आलेले गोपालक त्रस्त झाले आहेत.
महागाव तालुक्यात जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. दुधाळ जनावरांना पोटफुगीचा त्रास जाणवू लागला आहे. अशा जनावरांना घेऊन पशुचिकित्सालयात गोपालक गेल्यास डॉक्टरच भेट नाही. दिवसभर जनावरांना घेऊन तात्कळत राहावे लागते. महागाव सारख्या तालुका मुख्यालयाचीच ही अवस्था असेल तर इतर पशुचिकित्सालयाची काय अवस्था असेल, असा प्रश्न आहे. अनंतवाडी येथील सोमला राठोड यांच्या शेळीला कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी हा शेतकरी महागाव आणि खडका येथील पशुचिकित्सालयाचे उंबरठे झिजवत आहे. दोन दिवसांपासून डॉक्टर मिळाले नाही. अखेर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु उपयोग झाला नाही. कलगाव येथील अंकुश भवानकर यांची गाय अज्ञात रोगाने त्रस्त आहे. तिचे पोट फुगले आहे. २०० रुपयांचा दररोज दुधाचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. पिंपळगाव ई. येथील लक्ष्मण वानखेडे, भाऊसाहेब पाईकराव, भगवान इंगळे, माधव जंगले, योगाजी खोकले यांना बैलजोडीच्या खरेदीसाठी पशुचिकित्सकाचा दाखला पाहिजे. आठ दिवसांपासून हे शेतकरी पशुधन विकास अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत परंतु उपयोग होत नाही.
महागाव तालुक्यात महागाव, फुलसावंगी, गुंज, वनोली, काळी दौ., खडका, मुडाणा, पोखरी, डेंभी, वडद येथे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ११२ गावातील एक लाख ९ हजार १६५ जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु अपवाद वगळता पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयीच राहात नाही. खेड्यातून जनावरे घेऊन आलेला शेतकरी महागावात दिवसभर तात्काळत असतो. विना चारापाण्याची जनावरे परिसरात बांधून असतात. या सर्व प्रकाराकडे जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
जनावरांचे शवविच्छेदन अडकले
नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय मदत मिळते परंतु महागाव तालुक्यातील अनेक मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवाल अडकले आहे. उटी येथील रामराव पाटील गावंडे यांनी आपल्या मृत म्हशीच्या अहवालासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले, परंतु अद्यापही अहवाल दिला नाही. तालुक्यातील अनेक जनावरे पुरात वाहून गेली, मात्र त्यांचे शवविच्छेदन आणि अहवाल अडकले आहे. वारंवार तक्रारी करूनही याबाबची दखल मात्र घेण्यात येत नाही.