Vesey's 'Master Marind' on the way to Chhattisgarh | भीसीचा ‘मास्टर माईंड’ छत्तीसगडच्या वाटेवर
भीसीचा ‘मास्टर माईंड’ छत्तीसगडच्या वाटेवर

ठळक मुद्देफसवणूक दीडशे कोटींच्या घरात : रायपुरात भाड्याने घर घेतले, धामणगाव रोडवरील घर विक्रीला काढले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात भीसीतून झालेल्या फसवणुकीचा आकडा दीडशे कोटींच्या घरात पोहोचल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान या फसवणुकीतील सूत्रधार असलेला भीसीचा एक आॅर्गनायझर यवतमाळातील स्थावर मालमत्ता विकून छत्तीसगढमध्ये पळून जाण्याच्या तयारीला लागला आहे.
भीसीचा हा ऑर्गनायझर धामणगाव रोड परिसरातील रहिवासी आहे. भीसीतील दीडशे कोटींच्या फसवणुकीत निवडक मास्टर माईंड पैकी तो एक आहे. आतापर्यंत कुणीही पोलिसात फिर्याद न नोंदविल्याने अनेकांच्या गळ्यात फसवणुकीची ‘माळ’ घालूनही हा मास्टर माईंड अगदी बिनधास्त आहे. प्रकरण शांत झाले, आता पैसे देण्याची गरज नाही असे तो सांगतो आहे. या मास्टर माईंडने आता यवतमाळ सोडून पळून जाण्याची व्युहरचना केली आहे. त्यासाठी त्याने छत्तीसगढमधील रायपूर हे ठिकाणी निश्चित केले आहे. तेथे त्याने भाड्याने घरही घेतले. त्याच वेळी यवतमाळातील घर विक्रीला काढले आहे. घराचे पूर्ण पैसे मिळावे म्हणून ‘थर्ड पार्टी’ ग्राहक शोधला जात आहे. भीसीतील एखाद्या ग्राहकाने हे घर घेण्याची तयारी दर्शविल्यास तो त्याचे पैसे कापून घेण्याची भीती आहे. म्हणूनच गोपनीय पद्धतीने थेट नवा ग्राहक शोधला जात आहे. या मास्टर माईंडला आतापर्यंत पाठबळ देणारा सरदार चौकातील प्रतिष्ठीत व्यापारी आता दोन पाऊल मागे आला आहे. या व्यापाऱ्याने या ऑर्गनायझरची हमी घेणे बंद केले असून माझा त्याचा संबंध नसल्याचे सांगतो आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे सतर्क झालेला हा व्यापारी फसवणुकीपासून वाचला हे विशेष. भीसीच्या या प्रकरणात आता पोलीस संबंधितांचा माग काढणार असल्याचे सांगितले जाते.

यवतमाळ शहरात अवैध सावकारीही जोरातच
एकीकडे भीसी व्यवसायातून दीडशे कोटी रुपयांची व्यापारी-व्यावसायिकांची फसवणूक झाली आहे. तर दुसरीकडे यवतमाळ शहरात अवैध सावकारीही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विविध व्यवसायातील प्रतिष्ठीत या अवैध सावकारीत उतरले आहे. त्यांनी व्याज व मुद्दलाच्या वसुलीसाठी चक्क गुंड पोसले आहे. ही अवैध सावकारी सहकार प्रशासनासाठी खुले आव्हान ठरली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही या अवैध सावकारीतील गुंतवणुकीपासून दूर नाही. त्यांचे आर्थिक उलाढालीचे फंडेही विस्मयकारक आहे. एका डॉक्टरने एकीकडे हॉस्पिटल बांधण्यासाठी अर्बन बँकेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर दुसरीकडे याच डॉक्टरने वीर वामनराव चौक परिसरात सुमारे साडेचार कोटी रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तेचा नुकताच सौदा केला आहे. रेकॉर्डवर ही मालमत्ता अवघी एक ते सव्वा कोटींची दाखविली जाणार आहे. या डॉक्टरचे एमआयडीसीतही तीन मोठी बांधकामे सुरू असून ती ९० टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगितले जाते. या डॉक्टरचे हॉस्पिटलही वादाच्या भोवऱ्यात आहे. एलआयसी चौक परिसरातील एका कार्यालयाच्या माध्यमातून हा डॉक्टर चक्क अवैध सावकारीत पैसा गुंतवित असल्याची माहिती आहे. या डॉक्टरने आपले फसलेले पैसे वसूल करण्यासाठी एका भुरट्या राजकीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून पोलिसांची मदत घेतली होती. मात्र यातील पैसे त्या कार्यकर्त्यानेच परस्पर ठेऊन घेतले. या प्रकरणात पैशासाठी पोलिसांचा दबाव आणला गेलेली व्यक्ती आता फौजदारी तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले
जाते.

‘त्या’ दलालाला हाकलले
‘मीडिया को मै संभाल लुंगा’ असा दावा करणारा एक दलाल धामणगाव रोडवरील मास्टर माईंडला मदत करतो. काही ठिकाणी मास्टर माईंड त्या दलालाला सोबत घेऊनही गेला. दलालाने काही जणांकडे आपले नेहमीचे पत्तेही फेकले. हा मास्टर माईंड या दलालाला दारव्हा रोड स्थित एका हॉटेल व्यावसायिकाकडे घेऊन गेला होता. मात्र या दलालाची समाजातील पत आधीच माहीत असल्याने त्या हॉटेल व्यावसायिकाने दारातूनच या दलालाला हाकलून लावले.

Web Title: Vesey's 'Master Marind' on the way to Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.