शासकीय कार्यक्रमात वसंत पुरकेंना डावलले
By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-28T01:20:20+5:302014-06-28T01:20:20+5:30
मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमात स्थानिक आमदार विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांना डावलण्यात आले.

शासकीय कार्यक्रमात वसंत पुरकेंना डावलले
राळेगाव : मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमात स्थानिक आमदार विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांना डावलण्यात आले. दरम्यान, त्यांनी विश्रामगृहाच्या कक्षात अनेकांसमक्ष अर्धातासपर्यंत संबंधित अभियंत्याची खरडपट्टी काढली. कार्यक्रमातून डावलणे हा माझा व मतदारसंघातील जनतेचा एकप्रकारे अपमान आहे. यामुळे हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तालुक्याच्या वाठोडा (रानवड) येथे शिरपूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन नियोजित होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव टाकण्यात आले नाही. शिवाय निमंत्रणही दिले नाही. यामुळे त्यांचा पारा गरम झाला. जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराज वड्डेवार यांना त्यांनी चांगलेच खडसावले. सदर कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी हे मुख्य पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर एक तासाने निघून गेले. दुपारी १२ च्या सुमारास बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात काहींचे जेवण झाले तर काहींचे सुरू होते. त्यानंतर विविध गटांत कुजबुज सुरू होती. दुपारी २ च्या सुमारास प्रा. पुरके यांचे विश्रामगृहात अचानक आगमन झाले. काही वेळानंतर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थितांची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून त्यांची सिंचन अभियंत्याला पाचारण केले. झालेला कार्यक्रम शासकीय की अशासकीय होता, याची विचारणा केली. शासकीय कार्यक्रम होता तर आपल्याला निमंत्रण का देण्यात आले नाही आणि पत्रिकेतही नाव का घेतले नाही, असा खडा सवाल केला. अशासकीय कार्यक्रम होता तर आपण येथे कसे, असा प्रतिप्रश्न विचारून अभियंत्याला घाम फोडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे यांचे कार्यकर्ते तर अरविंद वाढोणकर, नरेंद्र जयसिंगकार, सरपंच सुधाकर गेडाम आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)