‘वसंत’चा तिढा कायम

By Admin | Updated: August 22, 2015 02:40 IST2015-08-22T02:40:08+5:302015-08-22T02:40:08+5:30

परंपरागत पिकांमुळे कर्जाचा डोंगर वाढत असल्याने पुसद व उमरखेड उपविभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली.

'Vasant' continued to be scared | ‘वसंत’चा तिढा कायम

‘वसंत’चा तिढा कायम

स्वप्नील कनवाळे पोफाळी
परंपरागत पिकांमुळे कर्जाचा डोंगर वाढत असल्याने पुसद व उमरखेड उपविभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. एकट्या वसंतच्या कार्यक्षेत्रात आठ हजार ७०० हेक्टर उसाची नोंद आहे. मात्र गत २० दिवसांपासून थकीत वेतनामुळे वसंतच्या कामगारांचा तिढा कायम आहे. अशा परिस्थितीत कारखाना सुरुच झाला नाही तर अशी शंका घेत शेतकरी हादरल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील कारखान्यांनी ऊस नेण्यास आतापासूनच नकारघंटा दिल्याने शेतकऱ्यांपुढे बिकट प्रश्न उभा ठाकणार आहे.
सोयाबीन, कपाशी पिकाने दगा दिल्याने शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे वळले आहे. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या भरोश्यावर ८ हजार ७०० हेक्टरमध्ये उसाची लागवड झाली. सुमारे सात लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे. असे असतानाच २० दिवसांपासून वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी वेतनावरून आंदोलनात्मक पवित्रा घेतला. भीक मांगो आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले. दुसरीकडे जिल्हा बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. अशा स्थितीत वसंतचे चाक फिरते की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना लागली आहे. सुमारे पाच ते सहा हजार शेतकरी कुटुंब वसंत साखर कारखान्याच्या भरोश्यावर जगत आहे. परंतु साखरेचे भाव कमी झाल्याने आणि साखर उद्योगाबाबत गळचेपी धोरणाचा फटका वसंतला बसत आहे. शेतातील ऊसाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भातील सहकारी क्षेत्रातील एकमेव वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होता. त्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. परंतु आता हाही कारखाना अखेरच्या घटका मोजत असल्याने ऊस कोणाला द्यावा, असा प्रश्न आहे. इतर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी चक्क नकार दिला. यामुळे शेतातच ऊस जाळावा लागेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. वसंतला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: 'Vasant' continued to be scared