वन्यप्राण्यांच्या दहशतीत वणीत तेंदूपत्ता संकलन
By Admin | Updated: May 17, 2017 00:57 IST2017-05-17T00:57:44+5:302017-05-17T00:57:44+5:30
वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातील जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे.

वन्यप्राण्यांच्या दहशतीत वणीत तेंदूपत्ता संकलन
हल्ले सुरूच : टीचभर पोटासाठी जीव टांगणीला
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातील जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या दहशतीत मजुरांंना तेंदूपत्त्याचे संकलन करावे लागत आहे. कोणतीही सुरक्षा नसतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी भल्या पहाटेच शेकडो मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात रवाना होत आहेत.
गेल्या पाच वर्षांत वणी उपविभागातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या वेगाने वाढत आहे. पूर्वी या जंगलात रोही, हरिण, ससे, रानडुकर, मोर, सायाळ आदी वन्यजीव होते. मात्र अलिकडील पाच वर्षांत या जंगलामध्ये पट्टेदार वाघांची संख्या वाढत आहे. अस्वल, बिबट्याचेही दर्शन नागरिकांना होत आहे. यातून वन्यप्राणी आणि मानव संघर्ष वाढला आहे.
दोन दिवसांपूर्वी पांढरकवडा क्षेत्रात येणाऱ्या दुभाटी पोड येथील हुसेन टेकाम नामक ४५ वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. शेतीची कामे संपल्याने तो रोजगार मिळावा म्हणून तेंदूपत्ता संकलनासाठी गेला होता. मात्र घराकडे परत येताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला करून त्याला जखमी केले. मागील महिन्यात झरी तालुक्यातील एका तेंदूपत्ता मजुरावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. याच तालुक्यातील पवनारलगतच्या एफडीसीएमच्या जंगलात तीन वाघांचा वावर आहे. आजवर या जंगलात बिबट्याचा वावर नव्हता. मात्र तीन दिवसांपूवी एक बिबट वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. या जंगलात रानडुकरांची संख्याही मोठी आहे. वणी उपविभागातील जंगलात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे बाजारपेठेत येथील तेंदूपत्त्याला मागणीही आहे.
उन्हाळ्यात शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने तेंदू हंगाम या मजुरांसाठी पर्वणी असतो. तेंदूपत्ता संकलनातून मिळणाऱ्या पैशात पुढील काही महिन्याची जगण्याची तजवीत ते करीत असतात. त्यातून आर्थिक विवंचनाही दूर होते. त्यामुळे शेकडो मजूर दररोज तेंदूपत्ता संकलनाच्या कामात राबत आहेत.
तेंदूपत्ता तोडाईसाठी जंगलात जाणाऱ्यांमध्ये लहान मुलांसह घरातील मंडळीचाही सहभाग असतो. भल्या पहाटे जंगलात निघून जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे, असा या शेतमजुरांचा दिनक्रम सुरू आहे. यातून आर्थिक मिळकत होत असली तरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम मनात ठेऊन त्यांना तेंदूपत्ता संकलन करावे लागत असल्याचे चित्र आहे.
संरक्षणासाठी नवी शक्कल
वन्यप्राण्यांची संख्या झरी तालुक्यात अधिक आहे. दाभाडी, शिबला, मार्थाजून, वरपोड या जंगलात वन्यप्राण्यांसह वाघांचाही वावर आहे. दोन महिन्यांपूर्वी वरपोडच्या जंगलात एकाचवेळी दोन पट्टेदार वाघांनी दर्शन दिले होते. सध्या उन्हाची तिव्रता अधिक वाढल्याने जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी लोकवस्त्यांकडे येत आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये रात्रभर ध्वनीक्षेपकावर गाणी अथवा भजने वाजविली जात आहे. या आवाजामुळे वन्यजीव गावाकडे येत नसल्याचा गावकऱ्यांचा अनुभव आहे.